February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

तेरा वर्ष संघर्ष, अंगावर पोलीस केसेस; शेवटी डॉ. वडवान झाले “सोशल’ चे अध्यक्ष

सोलापूर : येथील सोलापूर सोशल असोसिएशन, सोलापूर या संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या वादात डॉ. अखलाक वडवान यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळास धर्मादाय उप आयुक्त प्रविण कुंभोजकर यांनी दि. २८ मे रोजी मंजूरी दिलेली आहे. यासाठी डॉ. वडवान यांना तेरा वर्ष संघर्ष करावा लागला. अंगावर पोलीस केसेसही झाल्या, या संकटांना ते डगमगले नाहीत. पण शेवटी न्याय झालाच.

या बाबत थोडक्यात माहिती अशी की, सोलापूर सोशल असोसिएशन ही सोलापूरातील मुस्लिम धर्मियांची अल्पसंख्याक अशी सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेमार्फत सोलापूरात बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंतचे अनेक शैक्षणिक प्रकल्प राबविले जातात. या संस्थेत दरवर्षी सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तर कर्मचार्यांची संख्या सुमारे ३५० इतकी आहे. पै. डॉ. महमदअली नवाबसाब वडवान यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची स्थापना झाली आणि त्यानंतर दुरदृष्टीने उत्तरोत्तर संस्थेची प्रगती होत गेली. ही संस्था सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जावू लागली.

कालांतराने जुने जाणते विश्वस्त हे मयत होत गेले आणि त्या जागी नविन विश्वस्त येत गेले. अशाच प्रकारे डॉ. अखलाक वडवान यांची निवड दि. ५ ऑगस्ट २०१२ रोजीच्या निवडणूकीत एकूण १७ विश्वस्तांसह झाली. ही निवडणूक ऍड. आय.ए. खान यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी स्विकारुन पार पाडली होती. या निवडणूकीत इस्माईल अ. सत्तार जमादार हे देखील सचिवपदी निवडून आले होते. त्यांनी बदल अहवाल हा शपथेवर दाखल केला होता. दरम्यानच्या काळात डॉ. महमदअली नवाबसाब वडवान यांचे निधन झाले. या परिस्थितीचा गैरफायदा घेवून इस्माईल अ. सत्तार जमादार यांनी स्वत:च दाखल केलेला बदल अहवाल हा खोटा आणि चुकीचा असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे डॉ. अखलाक वडवान यांनी हा बदल अहवाल चालविण्याची जबाबदारी स्विकारली. दरम्यानच्या काळात इस्माईल अ. सत्तार जमादार हे मयत झाले. त्यांचा मुलगा अलताफ जमादार यांनी देखील हा बदल अहवाल चालविण्याची जबाबदारी स्विकारली.

या प्रकरणातील महत्वाचे हरकतदार हे  सलीम सुभान शेख हे होते. त्यांनी दि. ३० ऑक्टोबर २००२ रोजी संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा दि. २० नोव्हेंबर २००२ रोजी मंजूर करण्यात आला होता. परंतु याबाबतचे कोणतेही पुरावे उपलब्घ नव्हते. त्यामुळे सलीम सुभान शेख यांनी कोणताही राजीनामा दिला नसल्याची भूमिका कोर्टात घेतली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाल्यानंतर सलीम सुभान शेख यांचा मुळ राजीनामा हा डॉ. अखलाक वडवान यांच्याकडे मिळाला. हा राजीनामा  कोर्टात सादर करण्यात आला. मात्र हा दस्त दाखल झाल्यानंतर सलीम सुभान शेख यांनी तो नाकारला नाही. हा अत्यंत महत्वाचा घटनात्मक बदल अहवाल मंजूरीकरीता न्यायालयात मोठा पुरावा ठरला.

हे चालू असताना फारुक कमिशनर यांनी स्वत:ची सचिवपदी निवड झाल्याचे दर्शविणारा बदल अहवाल २०१३ मध्ये दाखल केला. त्यात इस्माईल अ. सत्तार जमादार हे अध्यक्षपदी निवडून आल्याचे दर्शविले आणि सलीम सुभान शेख यांना देखील निवडून आल्याचे दर्शविले. डॉ. अखलाक वडवान यांच्याबदल अहवालास अर्जदार अलताफ जमादर, सलीम सुभान शेख आणि फारुक कमिशनर यांनी हरकती घेतल्या आणि हा बदल अहवाल नामंजूर करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती.

या प्रकरणामध्ये डॉ. अखलाक वडवान, सईद वडवान,  सलीम सुभान शेख, फारुख कमिशनर आणि अलताफ जमादार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या.  मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल तातडीने करण्याचे आदेश देखील पारीत केले होते. दोन्ही बाजूचे म्हणणे सविस्तर ऐकून घेवून डॉ. अखलाक वडवान यांची दि. ०५ आगस्ट २०१२ रोजी अध्यक्षपदी झालेली निवड ही वैध आणि कायदेशीर असल्याचा निर्वाळा देवून बदल अहवाल क‘. ६७०/२०१२ हा मंजूर करण्यात आला आणि त्याच बरोबर खोटी कागदपत्रे सादर करणे, खोटा जबाब नोंदविणे अशा कृत्याखाली अलताफ जमादार याच्या विरुध्द फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश देखील धर्मादाय उप आयुक्त यांनी देलेले आहेत. या प्रकारामुळे खोटे बदल अहवाल दाखल करणार्याना  चांगलीच चपराक बसलेली असून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले गेले.

याकामी डॉ. अखलाक वडवान यांच्यावतीने ऍड. नितीन हबीब, ऍड. रमेश रोडगी, ऍड. रोहित हबीब आणि अँड.अमरनाथ हबीब यांनी काम पाहिले. तर  अलताफ जमादर आणि फारुख कमिशनर यांच्या वतीने ऍड.एस.आर. मुंढे यांनी काम पाहिले. धर्मादाय  आयुक्त यांनी सोशल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अकलाक वडवान यांचे नाव कायम केल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ. वडवान यांचा सन्मान केला.

कोण आहेत डॉ. वडवान?

डॉ. महमदअली नवाबसाब वडवान यांचे चिरंजीव डॉक्टर अकलाक वडवान. त्यांनी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण कॅनडा व यूएस मध्ये घेतले. पत्नी डॉ. यास्मिन वडवान यांच्याबरोबर सौदी अरेबियाच्या एअर फोर्समध्ये फ्लाईट सर्जन म्हणून त्यांनी 22 वर्षे सेवा केली आहे.