सोलापूर: जिल्हा प्रशासनाद्वारे Ai टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत असल्याच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. Ai तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करीत असून याचा चांगला प्रभाव सरकारी कर्मचाऱ्यांवर दिसून येत आहे. यामुळे झेडपी शाळेवरील गुरुजी, तलाठी कार्यालयातील भाऊसाहेब अलर्ट मोडवर आले असून अंगणवाड्यांच्याही भेटी वाढल्याचे जंगम यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन सोलापूरच्या वतीने उडान-2025 अंतर्गत प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर व प्रशिक्षण हा कार्यक्रम बुधवार, दि. 30 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. या AI प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याहस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले आदी मान्यवर उपस्थित होते. दोन महिन्यात झालेल्या या मोहिमेच्या कार्यवाही संदर्भात सीईओ जंगम यांनी माहिती दिली. Ai टेक्नॉलॉजीचा वापर करीत नागरिकांची थेट संवाद साधून सरकारी कामकाजाविषयी तीन प्रश्न विचारले जात आहेत. प्रायोगिक तत्वावर शिक्षण, महिला व बालकल्याण, जिल्हा पुरवठा विभाग, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाचा समावेश करण्यात आला आहे. Ai कक्षातून दररोज 15 ते 20 हजार नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. या तंत्रज्ञानातून संपर्क साधलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात तीन प्रश्न विचारले जातात. त्यातून जी उत्तरे मिळतात त्यावर काम केले जात आहे. तुम्हाला रेशनचे धान्य मिळते का? किती मिळते? दुकान कधी उघडे? भाऊसाहेब तलाठी कार्यालयात उपलब्ध असतात का? अंगणवाडी वेळेवर सुरू होते का? तेथे दिलेला आहार चांगला असतो का? आरोग्य केंद्रात दररोज डॉक्टर वेळेवर येतात? का नर्स कशा वागतात? गुरुजी शाळेवर वेळेवर येतात का? चांगले शिकवतात का? असे प्रश्न विचारून संबंधित माहिती घेतली जात आहे.
या उपक्रमातून आतापर्यंत अकरा लाख लोकांना फोन केले गेले आहेत. त्यातील सुमारे साडेआठ लाख लोकांनी प्रतिसाद दिला आहे. साडेपाच लाख लोकांनी एक मिनिट संवाद साधला आहे. या टेक्नॉलॉजीच्या वापराद्वारे विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना किमान 45 सेकंद कालावधी अपेक्षित आहे. पण त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात लोक व्यक्त होत आहेत. यावरून आलेल्या तक्रारीवरून पुढील कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता अंगणवाडीच्या पर्यवेक्षकांच्या भेटी वाढल्याचे दिसून येईल. भाऊसाहेब तलाठी कार्यालयात अधिक वेळ उपलब्ध असल्याचे दिसून येईल तसेच झेडपी शाळेवरील गुरुजी आणि आरोग्य केंद्रातील डॉक्टरही वेळेवर उपस्थित असताना दिसून येत आहेत. त्याचा चांगला प्रभाव सरकारी कार्यालयावर दिसत आहे. ज्या ठिकाणाहून तक्रारी आल्या त्या ठिकाणी सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. पहिल्यांदा कारवाई करण्यापेक्षा चांगली कार्यवाही होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे, असे सीईओ जंगम यांनी सांगितले.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ