March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पालकमंत्री गोरे यांच्या “या’ निर्णयामुळे अधिकारी व कर्मचारी सुखावले

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या “याव निर्णयामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सुखावले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री गोरे सोमवार दि. 28 जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.

पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा नुकताच पार पडला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. आषाढी वारीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पालकमंत्री गोरे यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या या नियोजनाचे कौतुक केले आहे. पण पालकमंत्री गोरे यांनी या नियोजनाचे श्रेय जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी ते सोमवारी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आषाढी वारी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व पालखी व पंढरपूर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम घेतल्याबद्दल त्यांच्यासह सहभोजनाचा कार्यक्रम ही पालकमंत्र्यांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली केले आहे. आषाढी वारीत सेवाभाव म्हणून काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा असा जाहीर सन्मान पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे सर्वजण आनंदित झाले आहेत.