March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बापू– मालकाची नाराजी दूर करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री बदलणार ही चर्चा सुरू असतानाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवेळेस नाराज झालेले आमदार सुभाषबापू देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रयत्न सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी सोलापुरात या दोन्ही आमदाराच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि दक्षिणचे सुभाष देशमुख हे नाराज झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतलेल्या भूमिकेवर या दोघांनी फारकत घेत पालकमंत्र्याच्या बैठकीला हजर राहण्याचे टाळले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीनंतर पालकमंत्री गोरे ज्यावेळी सोलापूर दौऱ्यावर आले त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार कल्याण शेट्टी व शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली. कल्याण शेट्टी व कोठे यांची जवळीक बापू व मालक यांना खटकली आहे. त्यामुळे पालकमंत्री कोरे यांच्यापासून या दोघांनी अलिप्त धोरण ठेवल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापू व मालक यांचे ही भूमिका भाजपला हानिकारक असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनाला आले आहे. अशातच सोलापूरचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सोलापूरचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे दोन आमदारांमध्ये झालेली ही फारकत टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पालकमंत्री गोरे यांनी सोमवारी सायंकाळी बालाजी सरोवर मध्ये सर्व आमदार व मंडल अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याचे सूत्राने सांगितले.

कामांवर लक्ष देणार…

सध्या पालकमंत्री गोरे यांच्याशी जवळीक मध्ये असलेले शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांनी कामाचा सपाटा लावला आहे पण वास्तविक महापालिकेच्या हद्दीत शहर उत्तर व दक्षिणचा मोठा भाग येतो. या ठिकाणच्या महत्वाच्या कामाला सुरुवात झालेलीच नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील कामाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. शहर मध्य मध्ये भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सध्या नाराज दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांची जी निवड झाली त्यात कोठे समर्थकांचाच भरणा असल्याची तक्रार होत आहे. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील हालचालीवर पालकमंत्री गोरे यांना लक्ष द्यावे लागणार आहे.