February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सोलापुरात मराठा समाज एकवटला

सोलापूर : मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजबांधवांची मते जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. बुधवारी ते सोलापुरात आले असता त्यांना भेटण्यासाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे मोठी गर्दी उसळली होती.
विविध संघटना, संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या झुंडीच्या झुंडी विश्रामगृहावर दाखल होत होत्या. जरांगे-पाटील यांच्या भेटीच्या निमित्ताने शहर व जिल्हयातील मराठा समाज एकवटल्याचे चित्र दिसून आले. एकप्रकारे मराठा समाजबांधवांनी शक्तिप्रदर्शनच केले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देऊन शासकीय विश्रामगृह दणाणून सोडले होते.
जरांगे-पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. राज्य शासनाला अंतिम इशारा देण्यासाठी अंतरवली सराटी ते मुंबई असा भव्या लाँगमार्च काढण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. त्याच्या नियोजनासाठी मंगळवारी रात्रीच जरांगे-पाटील यांचे सोलापुरात आगमन झाले. यावेळी त्यांचे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी मराठा समाजातील विविध संघटना, संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन चर्चा केली. सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन जाधव यांनी या बैठकांचे नियोजन केले होते.
जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी पुरुषोत्तम बरडे, अमोल शिंदे, विनोद भोसले, सोमनाथ राऊत, अ‍ॅड. श्रीरंग लाळे, मनीषा नलावडे, लता ढेरे, शोभना सागर, रवी मोहिते, डॉ.प्रमोद पाटील, विजय पोखरकर, चेतन नरोटे, सुशील बंदपट्टे, तुकाराम मस्के, महेश पवार, सचिन गुंड, विठ्ठल शिंदे, निर्मला शेळवणे यांच्यासह मराठा समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.
महिला समाजातील भगिनींनी मनोज जरांगे-पाटील यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले.

काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत करण्यात येणार्‍या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांची भेट घेऊन दिले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले, शहर कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, दत्तू बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलन नव्हे तर आत्मसन्मानाचा आवाज

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, कुणबी-मराठा समानतेची अधिकृत घोषणा करावी, 58 लाख नोंदींची त्वरित अंमलबजावणी करावी, सगे-सोयर्‍यांचा समावेश करावा, ओबीसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, जुन्या प्रकरणांची तपासणी करून निर्णय घ्यावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी प्रमुख मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन नसून, मराठा समाजाच्या आत्मसन्मानाचा आवाज आहे, असे सांगत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाज बांधवांना मुंबईत मोठ्या संख्येने एकवटण्याचे आवाहन केले.
मुस्लीम बांधवांनीही घेतली भेट
शिवजन्मोत्सव महामंडळाचे माजी अध्यक्ष मतीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील शिष्टमंडळाने मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी होण्याचा शब्दही दिला.