March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

भर पावसात शेतकरी अनवाणी गावाकडे; पत्रकार, पोलिसांने केली मदत

सोलापूर : बस आली नाही, रिक्षा चालकाने ज्यादा भाडे मागितले म्हणून भर पावसात पत्नी व लहान मुलासह अनवाणी गावाकडे चालत निघालेल्या शेतकऱ्याला एका पत्रकार व पोलिसांनी मदत केल्याची माणुसकीची घटना शुक्रवारी रात्री विजयपूर रोडवर घडली.

शुक्रवारी दुपारनंतर सोलापुरात पावसाची रिपरिप सुरू झाली. सायंकाळनंतर हा पाऊस वाढत गेला. रात्री आठ वाजता पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. अशात कामावर जाण्यासाठी “लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार राकेश कदम हे होटगी रोडकडे निघाले होते. पनाश अपार्टमेंटसमोर नेहरूनगरकडून सैफुलकडे अशा भर पावसात एक शेतकरी त्याच्यापाठोपाठ लहान मुलगा व पत्नी अनवाणी पायी चालत निघालेले त्यांच्या दृष्टीस पडले. हे नक्कीच काहीतरी संकटात आहेत याची जाणीव कदम यांना झाली. जवळ जाऊन त्यांनी चौकशी केली. त्यावर त्या शेतकऱ्याने एसटी आली नाही, रिक्षावाले तीनशे रुपये मागत आहेत. माझ्याकडे इतके पैसे नाहीत म्हणून आम्ही गावी वडकबाळला पायी चालत निघालो असे उत्तर दिले. इतक्या भर पावसात अनवाणी मुलाला घेऊन कसे चालणार? असे विचारल्यावर आता नाईलाज आहे, असे त्या शेतकऱ्याने उत्तर दिले. यांना काय मदत करावी असा विचार कदम यांच्या डोक्यात आला. या तुम्ही माझ्या पाठीमागे, असे म्हणत ते सैफुल पोलीस चौकीजवळ आले. पोलीस चौकीत बसलेल्या पोलीस शिपायाला त्यांनी मदत मागितली. त्या पोलीस शिपायांने या कुटुंबाला मदत करायचे ठरवले. हे दोघेही पावसात भिजत रस्त्यावर थांबून राहिले. थोड्या वेळात एक जीप तेथे आली. त्या पोलिसाने जीप अडवली व त्या कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली. जीपमध्ये बसलेल्या पटेल यांनी आपली ओळख सांगितली व मी बरूरकडे चाललो आहे. या कुटुंबांना गावापर्यंत सोडतोय असे आश्वासन दिले. जीप निघून गेली आणि या दोघांना हायसे वाटले.

समस्या इथेच संपत नाही. या मार्गावर ही स्थिती गेल्या अनेक दिवसांपसून आहे. सोलापूर शहराजवळील गावांना एसएमटीची बससेवा सुरू आहे. एसएमटीच्या ताफ्यात आता केवळ मोजक्या बस शिल्लक आहेत. तरीही एसएमटी ग्रामीण भागाला सेवा देते. मंद्रूप मार्गावर यापूर्वी चार बसच्या फेऱ्या होत्या. त्यामुळे तासाला एक बस याप्रमाणे रात्री नऊ वाजेपर्यंत बस सेवा होती. पण आता एसएमटी अस्तित्वहीन झाली तरी एक बस या मार्गावर धावते. ही बस अवेळी व पुन्हा फेरीला येईल की नाही याची शाशती नसलेली आहे. एसएमटीची बससेवा असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावरील बससेवा कमी केली आहे. त्यामुळे या दोघांच्या भरवशावर या मार्गावर प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची परवड होत आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी गेल्या दोन टर्ममध्ये या भागात चांगले रस्ते केले पण सार्वजनिक व्यवस्थेबाबत पाठपुरावा नसल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. मंद्रूपला बसस्थानकाची मागणी असताना व बसस्थानक मंजूर असताना या कामाकडे दुर्लक्ष झाले. एसएमटीच्या दुरावस्थेबाबत कोणीही पाठपुरावा करत नसल्यामुळे शहरातील लोकांबरोबर ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. रिक्षावाले मनमानीप्रमाणे भाडे घेत आहेत. मंद्रूप ते सोलापूर या 26 किलोमीटरच्या प्रवासाला राज्य परिवहन चाळीस रुपये भाडे आकारते तर सैफुल ते बसस्थानक इतक्या अंतरासाठी रिक्षाचालक चाळीस रुपये घेत आहेत. प्रवाशांची लूट होत असताना या गंभीर समस्येकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. या घटनेने प्रवाशांच्या गैरसोयीला वाचा फुटली आहे. महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी ही बाब किती गांभीर्याने घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.