सोलापूर : जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी कृषी आणि जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. जिल्ह्यातील ‘रुक्मिणी महिला शेतकरी महासंघ प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ या महिला शेतकरी कंपनीच्या फेडरेशन कडून स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला तब्बल २९.७ मेट्रिक टन कांदा थेट श्रीलंकेत निर्यात केला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन जागतिक बाजारपेठेत मिळवलेले हे यश राज्यातील इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी मानले जात आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश सागर यांच्या हस्ते आणि सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या कांद्याच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हा महत्त्वाचा कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), उरण येथून श्रीलंकेसाठी अधिकृतपणे रवाना झाला आहे. या खेपेमध्ये एकूण १,१४१ कांद्याच्या बॅग्स निर्यात करण्यात आल्या असून, या थेट आंतरराष्ट्रीय व्यवहारामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला असून, या निर्यातीतून किमान १ रुपया प्रति किलो अतिरिक्त नफा मिळणार आहे.
या संपूर्ण निर्यात उपक्रमात जागतिक दर्जाचे पॅकिंग, कागदपत्रे आणि निर्यातीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘टेक्नो सर्व’ (Techno Serve) या संस्थेने मोलाचे सहकार्य केले आहे. कंटेनर रवानाप्रसंगी बोलताना अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ‘उमेद’ अभियानाच्या सोलापूर कक्षाचे आणि ‘टेक्नो सर्व’ या संस्थेचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण महिलांना योग्य मार्गदर्शन आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तर त्या जागतिक स्तरावर देखील मोठी क्रांती घडवू शकतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या ऐतिहासिकप्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, संतोष डोंबे यांच्यासह रुक्मिणी महिला शेतकरी महासंघ प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा सुनिता गोसावी, संचालिका अर्चना कदम तसेच टेक्नो सर्व (Techno Serve) या संस्थेचे प्रतिनिधी चंद्रवीर आणि मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. सोलापूरच्या ग्रामीण महिलांनी एकत्रितपणे उभी केलेली हे फेडरेशन आता आंतरराष्ट्रीय व्यापारात यशस्वी पाऊल ठेवून एक नवा आदर्श ठरली आहे.

More Stories
सोलापूर विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करून सोलापूरची विमानसेवा जोमाने सुरू ठेवण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
संघशताब्दीनिमित्त डॉ. हेडगेवार पटांगण सुशोभीकरणासाठी देवेंद्र कोठे यांच्यातर्फे 1 कोटींचा निधी