सोलापूर : तुमच्या गावाला पाच कोटीचे बक्षीस हवे आहे काय? मग सरपंच व ग्रामस्थ हो, तुमच्या गावात “या’ शाश्वत गोष्टी केल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून तुम्हाला निश्चित बक्षीस मिळणार आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी एकजूट करून 17 सप्टेंबर पासून या अभियानाला सुरुवात करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. यावेळी सीईओ कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत, सरपंच व सदस्यांसाठी राज्य जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ही कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामसेवक सरपंच सदस्य यांच्याबरोबरच गावातील संस्था, शालेय समितीचे सदस्य, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी अशा सर्वांना निमंत्रित केले जाणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभाही होणार आहे. प्रत्यक्षात 17 सप्टेंबर पासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात केली जाणार असून सर्व ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम लाईव्ह असणार आहे. त्यानंतर 10 जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या अभियानात केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांमध्ये जनजागृती करणे व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा उद्देश आहे. प्रत्येक वर्षी या योजनेत 20 टक्के ग्रामपंचायत सहभाग असणार असून पुढील पाच वर्षात 100% ग्रामपंचायतीना यामध्ये यश मिळणार आहे असे नियोजन करण्यात येत आहे.
या अभियानात सात घटकांचा प्रामुख्याने सहभाग आहे. यात ग्रामस्थांच्या सहभागाने रेन हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, प्लास्टिक बंदी, स्वच्छता मोहीम आदी उपक्रमाचा समावेश आहे. प्रशासकीयस्तरावर सुशासनयुक्त पुढील बाबींचा समावेश असणार आहे. लोकाभिमुख प्रशासन, नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, गावात सीसीटीव्ही बसवणे, ग्रामपंचायत लेखा हिशोब आद्ययावत ठेवणे व लेखा परीक्षण करणे, ग्रामपंचायतच्या सर्व सभा व कार्य वृत्तांत नोंदवाही अद्ययावत करणे, ग्रामविकास समितीचे कामकाज व्यवस्थितपणे चालवणे, मतदार व नागरिकांनी ॲप डाऊनलोड करणे, आयुष्यमान भारत कार्ड सर्वांना काढून देणे, दिव्यांगाना ओळखपत्र मिळवून देणे, पाणीपट्टी व्यवस्थितपणे वसुली करणे, लोकवर्णीतून सुविधा निर्माण करणे, स्व उत्पन्न वाढवणे, शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करणे, विद्युत देयके व्यवस्थितपणे भरणे, पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र बळकटीकरण करणे, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे, अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवणे, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करणे, सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे, शाळा, अंगणवाडी, रोजगार हमी योजना राबवणे, शाळा डिजिटल करणे यासह शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, जनावरांच गोठा, घरकुल मिळवून देणे अशा विविध योजना राबविणे यांचा समावेश आहे.
या योजनेतून ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर मोठ्या रकमेची बक्षिस आहेत. राज्यात पहिल्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटीचे बक्षीस मिळणार आहे. योजना राबविण्यासाठी शासनाने 290 कोटीची तरतूद केली आहे. या बक्षिसाची रक्कम गावातील विकास कामासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी या योजनेतून बक्षीस मिळावे यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सीईओ जंगम यांनी केले आहे.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की