सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जून 2021 च्या झालेल्या कर्मचारी भरती घोटाळ्याचा ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात म्हणजेच जून 2021 मध्ये जिल्हा परिषदेत कर्मचारी भरती झाली. या भरतीत ग्रामपंचायत कोट्यातून 55 कर्मचारी अतिरिक्त भरले केले आहेत. याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आठ आठवड्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने निर्णय घ्यावा, असा निर्णय दिला. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 24 ऑगस्ट रोजी संघटनेला लेखी कळवले आहे. यात त्यांनी जून 2021 च्या भरतीमध्ये ग्रामपंचायत कोट्यातून 55 जागा अतिरिक्त भरल्या गेल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात ठपका ठेवून चार जणांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याबाबत ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल पाठवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी “सोलापूर समाचार’ शी बोलताना सांगितले.
चौकशी समिती नेमणार
ग्रामपंचायत कोट्यातील भरती प्रकरणात अतिरिक्त जागा भरून अनिमितता केल्याप्रकरणी तत्कालीन प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, कक्ष अधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासनाधिकारी शिवानंद मगे, वरिष्ठ सहाय्यक शेतसंधी या चौघांना विभागीय चौकशीबाबत नोटीसा पाठवण्यात आले आहेत. यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का? याचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे लवकरच हे प्रकरण चौकशी समितीकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. हे समिती या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करेल. त्यानंतर पुढील कारवाई ठरणार आहे.
राऊत यांची चौकशी कोण करणार?
या प्रकरणाचा ठपका ठेवून डीई प्रस्तावित करण्यात आलेले परमेश्वर राऊत हे सध्या साताऱ्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यांनी अद्याप पदभार घेतला नाही. ते अतिरिक्त सीईओ असल्यामुळे त्यांची चौकशी कोण करणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामविकास विभागाकडून याबाबत पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
झेडपीतर्फे अधिकृत माहिती प्रसिद्ध
जून 2021 च्या कर्मचारी भरतीतील ग्रामपंचायत विभागाच्या कोट्यातून झालेल्या अनियमिततेबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागामार्फत अधिकृत प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. यात ग्रामपंचायत कोट्यातून भरती करताना 2021 मध्ये कसा घोटाळा झाला याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

More Stories
बा विठ्ठला… वारकऱ्यांच्या सेवेसाठी अंगी बळ दे; सीईओ कुशल जैन यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
माऊलीचा पालखी सोहळा जाणून घेण्यासाठी झेडपीचे नूतन सीईओ जैन फिल्डवर
मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हासाठी कशाला हट्ट करेन…