सोलापूर : रासायनिक खताच्या पिशवीवर पुण्यातील चुकीचा पत्ता टाकून बनावट खत विक्रीस ठेवल्याप्रकरणी अकलूज– माळशिरस रस्त्यावरील बागेचीवाडी येथील पाटीलवस्तीवर असलेल्या हरी ओम कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 93 हजाराचा बनावट खत साठा जप्त केला आहे.
याप्रकरणी माळशिरसचे कृषी अधिकारी शरद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरी ओम कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर जालिंदर बाबुराव कदम मल्टीस्टार क्रॉप सायन्सेस कंपनीचे प्रतिनिधी नंदकिशोर भानुदास सोनटक्के राहणार कोंडभावी तालुका माळशिरस या दोघांविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीवरून भरारी पथकाचे अध्यक्ष तथा जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, माढा तालुक्याचे कृषी अधिकारी शरद गावडे यांच्या पथकाने हरिओम कृषी सेवा केंद्रावर धाड टाकली. त्यावेळी या पथकास हरी ओम कृषी सेवा केंद्राचे जालिंदर कदम यांनी या खताच्या विक्री व साठ्याचा परवाना घेतला नाही, शेतकऱ्यांना बिल दिले नाहीत. खताच्या साठा व विक्रीची नोंदवही ठेवली नाही, खताचा साठा व दरपत्रक प्रसिद्ध केलेले नाहीत, तसेच मल्टीस्टार क्रॉप सायन्सेस कंपनीकडून आलेल्या खताबाबत खातरजमा केली नाही. या खताचा 93528 किमतीचा साठा करून ठेवला. मल्टीस्टार क्रॉप सायन्सेस कंपनी पुण्यातील मांजरी तालुका हवेली येथे अस्तित्वात नसताना पोत्यावर तसा पत्ता छापून शेतकरी व शासनाची फसवणूक केली म्हणून कंपनीचे प्रतिनिधी नंदकुमार भानुदास सोनटक्के या दोघाविरुद्ध खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम व इतर कलमाखाली माळशिरस पोलीस ठाण्यात 10 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

More Stories
अमोल जाधव यांना पांडुरंग पावला; मिळाली पंढरपूरची पोस्टिंग
पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिरात झेडपी अध्यक्षांना डावलले
राज्यातील जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत