पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी शासन कटीबद्ध: पालकमंत्री गोरे

Rajkumar Sarole
2 Min Read

सोलापूर : माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव, वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी कीट व भाऊबीज भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, सरकार पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी कटिबद्ध असून, नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिवाळी कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, “स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वयंसेवक, ग्रामस्थ व प्रशासनाने धैर्याने काम केले. आम्ही फुंकर मारण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत मिळेल.”

दिवाळीसाठी परिपूर्ण कीट तयार करण्यात आले असून, यात आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये साडी, पॅंट, शर्ट व कीटचेही वाटप करण्यात आले. घरकुलासाठी जागा व वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून, द्राक्षबागांचे पंचनामेही करण्यात येणार आहेत. राज्य शासनाकडून घरांसाठी ₹१.२० लाख तर प्रधानमंत्री घरकुल योजनेतून ₹२.५० लाख देण्याचा प्रयत्न आहे.

रस्ते, पूल दुरुस्ती, विद्युत पंपांचे पुनर्बांधणी, वीजबिल असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, तसेच जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अभिजीत पाटील यांनी प्राथमिक मदत दिल्याचे सांगत, जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त केली. प्रा. शिवाजीराव सावंत (राजवी ऍग्रो) यांनी शासनाने दिलेल्या प्राथमिक मदतीबाबत समाधान व्यक्त करत अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रणजितसिंह शिंदे (जिल्हा दूध संघ) यांनी पुरतला ऊस सरसकट तोडण्याची ग्वाही दिली व विद्युत मोटारीसाठी नुकसानभरपाईची मागणी केली.

कार्यक्रमास पालकमंत्री गोरे, आमदार पाटील, प्रा. सावंत, अध्यक्ष शिंदे, दादासाहेब साठे, नगराध्यक्षा मीनल साठे, पृथ्वीराज सावंत, सरपंच ऋतुराज सावंत, सरपंच कुसुम पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसिलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे, चेतनसिंग केदार, मुन्ना साठे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *