December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर प्राणी संग्रहालयातील 79 चितळांनी घेतली सह्याद्रीच्या कुशीत झेप

सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयातील 79 चितळ सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्पांला गती देण्यासाठी वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR), महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू धर्मादाय न्यास (RESQ चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्यात सह्याद्री परिसरातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे वन्यजीवांचे आरोग्य, तात्काळ पशुवैद्यकीय मदत, प्राणी संख्या व्यवस्थापन आणि मानव- वन्यजीव संघर्ष निवारणासाठी एक प्रभावी, तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणाली उभारली जाणार असल्याची माहिती वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे. या अंतर्गत गेल्या दोन दिवसांत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७९ चितळ प्राण्यांचे चांदोली राष्ट्रीय उद्यानात यशस्वी पुनर्स्थानांतरण करण्यात आले आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात भाटे यांनी म्हटले आहे की, या सामंजस्य करारांतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू न्यास संयुक्तपणे प्रगत पशुवैद्यकीय सेवा, वैज्ञानिक पद्धतीने वन्यजीव पकड व स्थलांतर, तसेच आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्याचे काम करणार आहेत. प्रशिक्षितपशुवैद्यकीयय पथके, तांत्रिक कर्मचारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित कार्यपद्धती, मुक्तते नंतर निरीक्षण प्रणाली आणि क्षेत्र सेवकांसाठी संरचित प्रशिक्षण कार्यक्रम हे या सहकार्यातील प्रमुख घटक म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय सह्याद्री परिसरातील ‘पॉप्युलेशन ऑग्मेंटेशन’ आणि दीर्घकालीन संवर्धन नियोजना या दोन्ही संस्था संयुक्तपणे पाठबळ देणार आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक (फील्ड डायरेक्टर) तुषार चव्हाण, या सामंजस्य कराराबद्दल समाधान व्यक्त करताना म्हणाले, ‘सह्याद्री’च्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी विज्ञानाधिष्ठित नियोजन, कुशल तांत्रिक पथके आणि व्यावसायिक पशुवैद्यकीय सहाय्य अत्यावश्यक आहे. या भागीदारीमुळे आमची क्षेत्रीय क्षमता वाढेल आणि संवर्धनासाठीचे हस्तक्षेप अधिक गुणवत्तापूर्ण होतील.

महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयात चितळांची संख्या 167 वर गेली आहे. शासनाच्या सूचनेनुसार काही दिवसापूर्वी यातील 79 चितळ सह्याद्रीच्या डोंगररांगात निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहेत.

तपन डंके, प्रभारी देखरेख अधिकारी 

महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालय, 

महानगरपालिका सोलापूर