March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर कवायत संचलनात 5 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

सोलापूर: “राष्ट्रप्रथम” या शासनाच्या संकल्पनेवर आधारित सोलापूर जिल्ह्यामध्ये 77 व्या भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व व्यवस्थापनाच्या 4702 प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील 8.10 लाख विद्यार्थी व 25 हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत संचलनाचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या कवायतीचा मुख्य समारोह संपत्र झाला. यामध्ये शहरातील विविध शाळांमधील 5 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम (भा.प्र.से.) यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे,महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे तसेच मनपा शिक्षण मंडळाचे सर्व पर्यवेक्षक, माध्यमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी या कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, एकता आणि अनुशासन व विकसित भारताप्रती विद्यार्थ्यांचे योगदानाबाबत सजगता निर्माण करणे हा असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागण्यासाठी शिक्षण विभागाने सामूहिक कवायत व संचालन कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्र प्रेमाला चालना दिल्याचे सांगितले. ह. दे . प्रशालेच्या मैदानावर आयोजित सामूहिक कवायतमध्ये सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, सेंट जोसेफ, ज्ञान प्रबोधिनीमधील सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक शिस्तबद्ध कवायत व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करीत वंदे मातरम व इतर देशभक्तीपर घोषणा देऊन वातावरण दुमदुमून सोडले. विविध राष्ट्रपुरुषांच्या पेहराव विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ह. दे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा पाठक, चुंगे, उबाळे, हडपद, जोकारे, राघवेंद्र पिल्ले या शिक्षकांनी परिश्रम घेतले.