सोलापूर : गरिबांच्या अन्नसुरक्षेचा कणा असलेल्या रास्त भाव धान्य दुकानदारांनी आता थेट लोकशाहीच्या सभागृहात आपली छाप उमटवली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून दररोज हजारो नागरिकांशी थेट संपर्क असलेल्या सोलापूरमधील पाच रेशन दुकानदारांनी सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने विजय मिळवत नगरसेवकपदाचा मान पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत त्यांचा सत्कार करण्यात आला.
रास्त भाव धान्य दुकान हे केवळ धान्य वितरणाचे केंद्र नसून, प्रत्येक दुकानामागे ५०० ते ७०० रेशनकार्डधारक आणि सुमारे दोन ते तीन हजार लोकसंख्या जोडलेली असते. त्यामुळे या दुकानदारांचा जनसंपर्क, लोकांच्या अडचणींची जाण आणि विश्वासाचे नाते हेच त्यांच्या राजकीय यशाचे प्रमुख कारण ठरले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कार समारंभात विनायक विटकर (प्रभाग अ-६०), शेखर इगे (प्रभाग ब-५१), पूनम प्रभाकर काशीद (प्रभाग ब-४५), दिपिका वासुदेव यलदंडी (प्रभाग क-६६) तसेच केरोसीन परवानाधारक विजय भूमय्या चिप्पा या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख, पंच कमिटी सदस्य विजयकुमार हिरेमठ, शिवकुमार चकोले, शिवशंकर कोरे, ड विभागाचे साजिद खान, वसीम शेख, जिल्हा सचिव राज कमटम, संगीता जाधव, मुक्ता नायकू तसेच जिल्हा संपर्क नितीन पेंटर यांची उपस्थिती होती.
रेशन कार्डधारकांसाठी जोडलेले हात आता शहराच्या विकासासाठी निर्णय घेतील, ही बाब सोलापूरसाठी अभिमानाची आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रेशन दुकानदारांनी टाळ्यांच्या गजरात नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. रेशन दुकानातून सुरू झालेला जनसेवेचा प्रवास थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोचल्याने, सोलापूरच्या राजकारणात ‘जनतेतून आलेले लोकप्रतिनिधी’ अशी त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

More Stories
आज दारातील पौर्णिमा… तुम्हाला महत्व माहित आहे का?
सोलापूर मनपा भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान