सोलापूरजिल्हा परिषद

बापरे… उत्तर सोलापुरात सरप्राईज व्हीजिटमध्ये झेडपी शाळांचे मुख्याध्यापक दिसले गायब

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद शाळेला विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या सरप्राईज व्हिजिटमध्ये मुख्याध्यापक गायब असल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीचा विषय हाती घेतला आहे. पदाधिकारी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सक्रिय असल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना शालेय शिक्षणाबाबत सजग असण्याबाबत सूचना केली आहे. यानुसार शालेय स्तरावर काय हालचाली दिसून येत आहेत याची तपासणी करण्यासाठी उत्तर सोलापूर पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी जमादार यांनी शनिवारी देगाव येथील पीएमसी शाळा व मुलांची शाळा या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी पीएमश्री शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत लांबे हे मस्टरवर सही करून कोणत्या प्रकारचे हालचाल रजिस्टर न भरता निघून गेल्याचे दिसून आले.

त्यानंतर विस्तार अधिकारी जमादार यांनी देगाव मुलांच्या शाळेची तपासणी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली शेलार या 22 जूनपासून शालेय कामावर हजर नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी पंचायत समिती गट शिक्षण कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारचा रजा अर्ज पाठवल्याचे दिसून आले नाही. याशिवाय प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे धान्यादी पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. याबाबत संबंधितावर नोटीस देऊन कारवाई करावी असा अहवाल शिक्षण विस्तार अधिकारी जमादार यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. सोलापूर शहराशेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळांची ही अवस्था असेल तर इतर तालुक्यात दुर्गम भागात असणाऱ्या शाळांची काय अवस्था असेल अशी चर्चा आता शिक्षण विभागात सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button