June 27, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीच्या आरोग्य विभागात टेंडरवरून कंत्राटी कर्मचारी, लेखाधिकार्‍यात तु तू मै मैं..

सोलापूर : आषाढी वारी तोंडावर असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे टेंडर फायनल झाले नसल्याचे ओरड होत असतानाच टेंडरवरून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी व जिल्हा परिषदेचे लेखाधिकार्‍यात तू तू मै मैं झाल्याची घटना समोर आली आहे. विना अनुभवी फार्मासिस्टकडे औषध खरेदीची सूत्रे गेल्यामुळे मोठा गोंधळ होत असल्याचे माध्यमानी उघड करूनसुद्धा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा आता कर्मचाऱ्यात रंगली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लेखाधिकार्‍यास शिवीगाळ केल्यामुळे या विभागातील कर्मचारी संतप्त झाले आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पंढरपुरातील आषाढी वारी तोंडावर असल्याने जिल्हा परिषदेवर सेवा सुविधांची तीन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. असे असताना इतर सर्व विभागांनी कामाचे टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना जिल्हा आरोग्य विभागाचे दहा कोटीची औषध खरेदी अद्याप रखडली आहे. अनुभव नसलेल्या फार्मसीस्टकडे ही जबाबदारी दिल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. टेंडर लोड करताना अनेक चुका झाल्यामुळे औषध खरेदीला विलंब होत आहे तर दुसरीकडे वैद्यकीय उपकरणाची खरेदीही झालेली नाही. असे असताना एक धक्कादायक प्रकार उघड केला आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्यासमोरच लेखाधिकारी पाटील व राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कुटुंब कल्याण विभागाचे कर्मचारी नामदे यांच्यात टेंडरच्या फाईलवरून खडाजंगी झाली. नामदे यांच्याकडे वैद्यकीय उपकरण खरेदीचे टेंडर करण्याची फाईल वरिष्ठ आणि दिली असे त्यांचे म्हणणे आहे. ही फाईल त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्याकडे नेल्यावर त्यांनी आरोग्य विभागाच्या लेखाधिकार्‍यांकडून ही फाईल तपासून आणण्याची सूचना केली. त्यानुसार नामदेव यांनी ही फाईल आरोग्य विभागाचे लेखाधिकारी पाटील यांच्याकडे नेली. पण पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे फाईल माझ्याकडे कशाला असे सांगितले. त्यावर नामदे डीएचओ कोपूरवाड यांच्याकडे गेले. त्यांनी लेखाधिकारी पाटील फाईल तपासून शेरा मारत नसल्याचे सांगितले. त्यावर डीएचओ कोपूरवाड यांनी पाटील यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. फाईलबद्दल विचारल्यावर पाटील यांनी कंत्राटी कर्मचारी माझ्याकडे फाईल कशाला घेऊन येतो, हे काम त्यांचे नाही असा सवाल केला. कंत्राटी कर्मचारी म्हटल्यामुळे नामदेव यांना राग आला व त्यांनी तुमची लायकी काय? असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे लेखाधिकारी पाटील संतापले आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एकेरीवर डीएचओसमोरच शिवीगाळ सुरू झाली. प्रकरण तापत असल्याचे पाहून डीएचओनी हस्तक्षेप केल्यानंतर पडदा पडला. पण या प्रकरणाची जिल्हा परिषदेत खुमासदार चर्चा सुरू आहे.

कोणाची टोपी कुणाला? 

आषाढी यात्रा कालावधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना टोप्या व टी-शर्ट खरेदी करण्याची ती फाईल होती अशी चर्चा आहे. या टेंडरची फाईल कंत्राटी कर्मचाऱ्याकडे कशाला असा लेखाधिकारी पाटील यांचा आरोप आहे. आरोग्य विभागात कोणाची टोपी कुणाला असा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. कोणती कामे कोणी करायची हे ठरलेले असतानाही विशिष्ट लाभाची कामे करण्यात व वरिष्ठांची सेवा केल्याचे दाखवून मेवा मारणारे कर्मचारी पुढे येत आहेत. त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. आषाढी वारीत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोप्या मिळणे दूरच राहिले पण मुख्यालयात राहून अशाप्रकारे टोप्या घालणाऱ्यांचा धंदा वाढल्याची चर्चा आहे.

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

यापूर्वी खरेदीचे सर्व काम फार्मसिस्ट सोळंकी पाहत होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशासनाने अनुभवी कर्मचाऱ्यांची फाईल ठेवली पण अशातच विभागीय आयुक्तांकडून फार्मशिष्ट पुजारी यांनी नियुक्ती मिळवली. पण त्यांना कामाचा कोणताच अनुभव नसल्यामुळे गोंधळ वाढला आहे. याबाबत तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे औषध व उपकरणे खरेदीचे अनेक कामे अडली आहेत. अशात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी कोणी दिली हा आता चर्चेचा विषय झाला आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा संवेदनशील प्रकरणात गांभीर्याने पाहत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेची बदनामी सुरूच राहणार आहे. त्यामुळे सीईओ कुशल जैन यांनी वेळेत सजग होणे गरजेचे असल्याचे मत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

या प्रकरणाबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी नामदेव यांना स्पष्टीकरण विचारल्यावर त्यांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे.फार्मासिस्ट सोळंकी सेवानिवृत्त झाल्यामुळे फार्मासिस्ट पुजारी यांना कामाचा अनुभव नसल्याने गोंधळ वाढला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी वैद्यकीय वाहन खरेदीच्या फाईलची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. या फाईलवर लेखाधिकार्‍याचा शेरा आवश्यक असल्याने मुख्य लेखाधिकार्‍यांच्या सूचनेने मी पाटील यांच्याकडे गेलो पण कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर तू कोण मला सांगणार असा त्यांनी जाब विचारल्याने मी प्रत्युत्तर दिले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी डीएचओ कोपुरवाड यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी कॉल रिसीव केला नाही.