February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

भाजपची रणनीती: सोलापूर झेडपीत येणार महिलाराज

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सत्तेचा दावेदार ठरलेल्या भाजपने धक्कातंत्र अवलंबल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद पहिल्यांदाच महिला राज आणण्याची तयारी असल्याचे भाजपच्या सूत्राने सांगितले.

जिल्हा परिषदेसाठी झालेल्या नुकत्याच निवडणुकीत भाजपने 68 पैकी 38 जागा घेऊन बहुमत प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गटात या आरक्षणावर निवडून आलेल्या दावेदारांची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी भाजपने एक वेगळाच धक्कातंत्र देण्याचे नियोजन सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी महिला असतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती पदावर महिला विराजमान होण्याचे संकेत आहेत. अध्यक्ष पदासाठी अक्कलकोट, बार्शी येथील उमेदवारांची चर्चा आहे. अक्कलकोटला अध्यक्षपद गेले तर उपाध्यक्ष बार्शीच्या राहणार आहेत. या दोन्ही पदानंतर दहा विषय समित्यांचा नंबर लागतो. त्यात महत्त्वाचे स्थायी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या समित्यांचा नंबर लागतो. त्याचबरोबर महिला व बालकल्याण सभापती करमाळा समाजकल्याण सभापती माळशिरसच्या सदस्यांना संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम समितीचे खाते वजनदार आहे. वास्तविक ही खाती उपाध्यक्ष यांच्याकडे असतात. पण यापूर्वी विजयराज डोंगरे यांनी ही खाते आपल्याकडे घेतली होती. पण आता भाजपच्या राजवटीत ही खाती पुन्हा उपाध्यक्षाकडे जाणार आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष यांच्याकडे यापूर्वी असलेली शिक्षण व आरोग्य खाती कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू आहे. स्थायी व जलव्यवस्थापन ही खाती अर्थात अध्यक्षांकडेच असणार आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभागाकडे आता सेस फंडाशिवाय काही राहिलेले नाही त्यामुळे या खात्यांवर नाम मात्र सभापती येणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याचे किंगमेकर आहेत. त्यांच्या शिफारशीवरूनच पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या नावांवरून व भाजपची रणनीती पाहिल्यास जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच वेगळे चित्र पहावयस मिळणार आहे.

पक्षनेत्यासाठी पत्र…

शासनाच्या आदेशानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड एकाच वेळी होणार आहे. शासनाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त याबाबतचे अधिसूचना जारी करतील त्याप्रमाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तारीख जाहीर करून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या राजकीय पक्षांना आपला पक्ष नेता निवडण्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने जिल्हा परिषदेतील पक्षनेता भाजपकडे जाणार आहे. निवडणुकीवेळी पक्षनेता आपल्या सदस्यांना व्हिप बजावतो. यासाठी सर्व पक्षाचे पक्षनेते लवकरच जाहीर होतील असे सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेतेपदी डोंगरे?

भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा सदस्य असलेला पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षनेतेपद या पक्षाला जाणार आहे. या पक्षाकडून निवडून आलेले अनुभवी म्हणून विजयराज डोंगरे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते म्हणून विजयराज डोंगरे हेच असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.