सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवडून येऊन आता जवळपास दोन महिने होत आहेत. आपल्या भागात विकास कामे करण्यासाठी नवीन सदस्यांना निधी हवा आहे. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेऊन पूर्वीप्रमाणे 60/40 चा फॉर्म्युला राबवावा, अशी मागणी सदस्यातून पुढे आली आहे.
राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी दौऱ्यावर आले आहेत. भाजपच्या कार्यक्रमानंतर त्यांनी जिल्हा नियोजन सभागृहात विविध बैठकांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य व महानगरपालिकांचे नगरसेवक यांच्याशी बैठक ठेवली आहे. विकास कामांबाबत अडचणी व इतर मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विषय समितीचे सभापती यांची निवड झाली आहे. 15 एप्रिल रोजी विषय समितीचे सदस्य निवडण्यात येणार आहेत. त्यानंतर 22 एप्रिलपासून पहिल्या सर्वसाधारण सभेद्वारे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. नुकतेच मार्च अखेर संपल्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या खर्चाचा विषय संपुष्टात आला आहे. एक एप्रिल पासून आता जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी राजवटीतील नवीन खर्चाच्या मंजुरीला सुरुवात होणार आहे. सेस फंडावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अधिकार राहणार आहे. शासनाकडून विविध योजनांसाठी मंजूर होणाऱ्या निधीच्या विकास कामासाठी जिल्हा परिषद सदस्यांना आता निधी हवा आहे. यापूर्वी गेली चार वर्ष जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसल्यामुळे प्रशासकीय राजवट सुरू होती. जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य नसल्यामुळे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे सदस्य म्हणून आमदारांनी काम केले आहे. त्यामुळे समाजकल्याण व इतर विभागातील सर्व कामे आमदारांच्या शिफारशीवर पालकमंत्री मंजूर करत होते. आता जिल्हा परिषदेत सदस्य आल्यामुळे आमदारांचे जिल्हा परिषदेतले सदस्यत्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता विकास कामाच्या प्रस्तावांना सदस्यांच्या पत्रांना अधिकार द्यावेत या मागणीला जोर धरला आहे.
काय आहे 60/ 40 फॉर्म्युला
यापूर्वी जिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना पालकमंत्र्यांना 40 तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना 60 टक्के कामे सुचविण्याचे अधिकार होते. या पद्धतीनुसार मंजूर निधी पैकी 60 टक्के कामे जिल्हा परिषद सदस्यांचे मंजूर होत होती. 40 टक्के कामे पालकमंत्र्यांच्या शिफारशीने मंजूर होत होती. आता हाच फॉर्मुला पुन्हा लागू करावा या मागणीला जोर धरला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आता नवीन आर्थिक वर्षापासून हा फॉर्मुला अमलात आणल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांच्या विकास कामांना चालना मिळणार आहे. आजच्या बैठकीत पालकमंत्री गोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या विकास कामाबाबत यापूर्वी काय पद्धत होती हे आम्ही समजावून घेत आहोत. 60/40 हा फॉर्म्युला आम्हाला अद्याप समजलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीत आम्ही यावर चर्चा करणार आहोत.
इंद्रजीत पवार
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सोलापूर


More Stories
कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज उपसा करणारे 6 हायवा, 1 पोकलँड जप्त
समाजकल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
सोलापूर झेडपीत विरोधी पक्ष नेताच नसणार