सोलापूर : नियमित कर भरणाऱ्यांना कोणतीही करवाढ, दरवाढ न करता सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १३७८ कोटी रुपयांच्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. मनपा सभेची मंजुरी म्हणजे दररोज समतोल पाणीपुरवठ्याच्या दिशेने पडलेले सकारात्मक पाऊल आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठीची ही योजना मंजूर करण्यात आली. या योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे. शहरी भाग आणि हद्दवाढ भाग अशा संपूर्ण शहराला दररोज २४ तास समतोल पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली. पूर्वीच्या ८९२ कोटी रुपयांच्या मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये जागतिक बँकेने आणि महाराष्ट्र शासनाने काही सुधारणा करण्यास सांगितल्या होत्या. त्यानुसार त्या सुधारणा करून नव्याने १३७८ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, असेही महापौर श्री. कोंड्याल म्हणाले.
सुधारित पाणीपुरवठा योजनेमध्ये १५० कोटी रुपयांच्या शासनाला भरावयाच्या जीएसटी कराचा समावेश आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पूर्वीच्या योजनेतील १२० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राऐवजी १५० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. पूर्वीच्या योजनेनुसार शुद्ध जलवाहिनी (फिडर मेन) ६५.७८ किमीची होणार होती. सुधारित योजनेअंतर्गत ती ७७.८ किमीची असेल. पूर्वीच्या योजनेत ११ एमएलचे ६ एमबीआर (मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर) प्रस्तावित होते. सुधारित योजनेनुसार २९ एमएलचे १० एमबीआर राहणार आहेत. ३१.८ एमएलचे २४ उंच जलकुंभ (इएसआर) बांधण्याचे नियोजन पूर्वीच्या योजनेत करण्यात आले होते. मात्र शहराच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन सुधारित योजनेनुसार आता ५३.३ एमएलचे ३० उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. शहरात समतोल पाणी वितरण व्यवस्थेसाठी ७२० किमी जलवाहिनी अंथरण्यात येणार होती. सुधारित योजनेनुसार शहरात एकूण १११७ किमी जलवाहिनी अंथरण्यात येणार आहे. पूर्वीच्या योजनेनुसार ४० हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार होते. सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यात २ लाख १८ हजार ८५३ मेकॅनिकल मीटरची वाढ करून एकूण २ लाख ४८ हजार मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत या निर्णयामुळे सोलापूर शहरात पाण्याची मोठी बचत होणार असून नागरिकांकडून पाण्याचा जितका वापर होईल तितकेच बिल नागरिकांना येणार आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याच्या योजनेतील वाढीव बजेटला शिंदे शिवसेनेचे अमोल शिंदे, काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी विरोध केला. त्यामुळे महापौर कुंडल यांनी या दोघांना सभेच्या कामकाजातून निलंबित करत बहुमताने हा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे व नरोटे यांनी सभागृहासमोर ठिय्या मारला. सत्ताधारी भाजपने कर प्रणालीत बदल करून नागरिकांवर मोठा बोजा टाकल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला दररोज समतोल पाणीपुरवठा करण्यासाठीची ही ऐतिहासिक आणि महत्वकांक्षी योजना सोलापूरला मंजूर झाली आहे. पुढील ४० वर्षांचा सोलापूर शहर विस्ताराचा विचार करून ही योजना बनवण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या योजनेस मिळालेली मंजुरी म्हणजे दररोज समतोल पाणीपुरवठ्याच्या दिशेने पडलेले सकारात्मक पाऊल आहे. यासाठी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
विनायक कोंड्याल, महापौर

More Stories
शिंदे शिवसेनेचा सोलापूर झेडपीतही घुमणार “आवाज’
सोलापुरात सायबर पोलिसांचा छापा: आयटी कंपन्यांना फसविणारे मोठे रॅकेट उघड
विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर