सोलापूर : महापालिकेत अमोल शिंदे ज्याप्रमाणे शिंदे शिवसेनेचा आवाज घुमवित आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतही आवाज घुमविला जाईल, अशी भूमिका झेडपीचे माजी पक्षनेते आनंद तानवडे यांनी सोमवारी मांडली.
जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सदस्यांची निवड नुकतीच पार पडली. त्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील शिवसेनेचे सदस्य प्रवीण तानवडे व शिवराज मेत्रे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे भाजपची कोंडी झाली होती. शिंदे सेनेच्या सदस्यांना भाजपने संधी दिली होती पण आमचा आग्रह स्थायी व समाज कल्याण समितीसाठी होता असे आनंद तानवडे यांनी स्पष्ट केले. माझ्याशी पक्षनेत्या रश्मी बागल यांनी संपर्क केला. अक्कलकोटचे भाग्यविधाते माजी आमदार कै. बाबासाहेब तानवडे व करमाळ्याचे माजी आमदार कै दिगंबर बागल यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे बागल यांच्या कन्या व जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्या म्हणून रश्मीताई बागल यांच्या शब्दाला आम्ही मान दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही भूमिका पॉझिटिव्ह होती. इथे निधीचा कोणताही प्रश्न आलेला नाही. पण मीडियाने किंगमेकर म्हणून विनाकारण महत्व वाढवले. शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अक्कलकोट तालुक्यावर विशेष लक्ष आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाला बळ दिले जात आहे. आगामी काळात अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतत आमची भूमिका ठाम राहणार आहे असे तानवडे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत सध्या विरोधी पक्षनेते पद खालसा केल्याचे दिसत आहे. तसे पाहिले तर पक्षनेता हे पद ही जिल्हा परिषदेच्या घटनेत नाही. सत्ताधाऱ्यांनी कारभार करण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली असली तरी शिंदे शिवसेना आपली ताकद दाखविणाराच आहे, अशी भूमिका आनंद तानवडे यांनी मांडली.
आमची मैत्री कायम…
जिल्हा परिषदेच्या मागील सदस्याच्या काळात आनंद तानवडे, मदन दराडे व अरुण तोडकर या तीन सदस्यांची चांगली मैत्री होती. झेडपीतील त्रिदेव म्हणून ते ओळखले जात. तानवडे व दराडे हे पूर्वीचे भाजपचे सदस्य. पण या निवडणुकीच्या वेळेस संधी न मिळाल्याने तानवडे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. सोमवारी तानवडे झेडपीत आले होते. मदन दराडे व त्यांची समोरासमोर भेट झाली. आमचे आता पक्ष वेगळे असले तरी मैत्री कायम आहे, अशी ओळख दोघांनी हात मिळवून दिली.


More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी