सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका हद्दीत 43 शाळा असून या शाळांच्या मालमत्तेची किंमत 200 कोटीवर गेली आहे. अशा बेनामी मालमत्तेचा शोध घेत असतानाच जिल्हा परिषदेच्या मालकीचे तीन फ्लॅटही सापडले आहेत. पण या फ्लॅटच्या वापराबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला दिसून येत नाही.
चार वर्षाच्या प्रशासक काळानंतर जिल्हा परिषदेच्या कारभाराची सूत्रे पदाधिकाऱ्यांकडे गेले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे उत्पन्न कसे वाढेल यावर विचार केला. सोलापूर महापालिकेने जिल्हा परिषदेच्या मालकीच्या हद्दीतील शाळांची हस्तांतरांची मागणी केली होती. याबाबत जिल्हा नियोजन सभेत चर्चा झाल्यानंतर शाळांची माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 43 शाळा महापालिकेच्या हद्दीत आहेत. या शाळा इमारतीसह वर्ग केल्यानंतर मालमत्तेचा खर्च जिल्हा परिषदेने द्यावा असा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार शिक्षण विभागाने मालमत्तेची मोजदाद केली असता या 43 शाळांच्या जागा व इमारतीची किंमत 200 कोटीच्या पुढे गेले आहे. इतकी रक्कम महापालिकेने भरल्यास या शाळा हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर होईल अशी स्थिती होती. पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांसमोर जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा आढावा घेतल्यानंतर या शाळा महापालिकेला हस्तांतर न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मालमत्तेची माहिती घेतली असता होटगी रस्त्यावर प्रियंका- प्रेरणा अपारमेंटमध्ये जिल्हा परिषदेचे तीन फ्लॅट असल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत या फ्लॅटमध्ये एक कर्मचारी राहत असून इतर दोन फ्लॅट रिकामेच आहेत. या फ्लॅटचे देखभाल दुरुस्ती ही झालेली नाही. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीत हे फ्लॅट घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी हे फ्लॅट देण्यात आले होते. पण आत्ता या प्लॉटचा काय उपयोग करायचा हे सद्यस्थितीत ठरलेले नाही. नूतन सीईओ कुशल जैन याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More Stories
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी
राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेसाठी 15 जूनपासून प्रवेश प्रक्रिया