सोलापूर : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी आणि कृषी अधिकारी यांची चौकशी होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या नाराजीनंतर हे पाऊल उचलले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
जिल्हा परिषदेची नुकतीच सर्वसाधारण सभा झाली. नवीन पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच सभा होती. सभेच्या अजेंड्यावर अकरा विषय होते. पण प्रत्यक्ष सभेचे कामकाज झाल्यानंतर आयत्या वेळचे 20 विषय घेण्यात आले. यामध्ये जिल्हा आरोग्य, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या विषयाचा जास्त प्रमाणात अंतर्भाव होता. सभा झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आयत्या वेळच्या विषयावर नाराजी व्यक्त केली. मला माहित नसताना यातील 15 विषय घुसडण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे अधिकार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे असतात. अध्यक्षांना माहिती न देता या विभाग प्रमुखांनी परस्पर सभेकडे हे विषय दिल्याचे आता उघड झाले आहे. यात आरोग्याचा विषय गंभीर आहे. आषाढी वारीसाठी दहा कोटीची औषध खरेदी हा आयत्या वेळचा विषय असू शकतो का? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयाबाबत अध्यक्षांना कल्पना देण्यात आलीच नाही. कृषी विभागाने तर कहरच केला आहे. खत व बी बियाणे विकण्याचा परवाना अधिकार जिल्हा परिषदेला द्यावा, असा ठराव आयत्या वेळच्या विषयात देण्यात आला. या ठरावाची इतकी काय गरज होती? असा आता सवाल उपस्थित झाला आहे. हा विषय राज्याच्या कृषी विभागाचा धोरणात्मक असताना ऐनवेळी आयत्या विषयात हा ठराव घुसडल्याने जिल्हा परिषदेला काय फायदा होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने तर सर्वच विषय आयत्या वेळच्या विषयात आणले. सभेची तारीख निघालेली असताना हे विभाग प्रमुख काय करीत होते असा आता सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य नाराज झाले आहेत. जाहीरपणे त्यांनीही नाराजी प्रकट केल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अवमान केल्या प्रकरणात विभाग प्रमुखांची चौकशी होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
आयत्या वेळचा विषय हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात येतो. विभाग प्रमुखांनी हे विषय सभेपुढे ठेवले आणि ते घेण्यात आले. यावर आता अध्यक्षच निर्णय घेतील.
स्मिता पाटील,
सचिव, जिल्हा परिषद सभागृह

More Stories
सोलापूरच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कमध्ये पोहताना मुलीचा मृत्यू
मंद्रूपला या दिवशी रंगणार जंगी कुस्त्यांचा फड
सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाईची सकल मराठा समाजाची मागणी