सोलापूर : श्वानदंश लशीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर झेडपीच्या आरोग्य विभागाने कोल्हापूरहून 1000 लसी उसनवारीने आणल्या असल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वानदौंश लशीची टंचाई असल्याची तक्रार केली होती. या लशीच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अधिकची तरतूद करण्याचीही सूचना करण्यात आली होती.
लशीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे अतिरिक्त साठ्याची मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील लशीची टंचाई दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 1000 लसी उसन्या घेण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेला या लसी प्राप्त झाल्यानंतर कोल्हापूरच्या लसी परत करण्यात येणार आहेत. टंचाई संपवण्यासाठी ही उसनवारी करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांचे कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर होटगी आरोग्य केंद्राला भेट दिली असता तेथील विदारक चित्र समोर आले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्राचे चित्र बदलण्यासंदर्भात कडक सूचना करण्यात आल्या आहेत. काही जणांना आरोग्य विभागाचे चित्र बदलायचेच नाही असे वाटते. अशा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आता पगारवाढ देताना विचार केला जाणार आहे असा इशाराही डॉक्टर कोपुरवाड यांनी दिला. अशी मानसिकता असणाऱ्या तीन डॉक्टरांना आता कामाला लावले आहे. इतरांमध्ये ही सुधारणा न झाल्यास त्यांचाही विचार केला जाणार आहे. कंदलगाव आरोग्य केंद्रालाही जिल्हा आरोग्य समन्वयकसोबत भेट देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आरोग्य विभागाला भेट दिल्यानंतर तात्काळ मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतः भेट दिली. आरोग्य केंद्रांच्या कामकाज सुधारण्याबाबत कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद करण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने सर्व ती तयारी करण्यात येत आहे, असेही डॉक्टर कोपूरवाड यांनी सांगितले.

More Stories
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात 304 जणांचे रक्तदान
दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे सोलापूरच्या दौऱ्यावर
अक्कलकोटमध्ये उडीदाच्या बोगस बियाणाचा मोठा साठा पकडला