सोलापूर : मराठा सेवा संघाची आक्रमक युवा संघटना म्हणून ओळख असलेली संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा एकसंध झाल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत सोलापूर शहर व जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ तसेच विविध कक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. ३० मे) छत्रपती संभाजी महाराज चौकात विजय जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा सेवा संघाची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे केली होती. त्यानंतर १९९१ मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली. आज मराठा सेवा संघाच्या विविध ३३ कक्षांपैकी संभाजी ब्रिगेड हा एक प्रभावी आणि सक्रिय कक्ष म्हणून कार्यरत आहे. ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकरी’ विचारसरणीवर आधारित संविधानवादी आणि परिवर्तनवादी युवकांची एक आक्रमक फळी म्हणून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक सलोखा, जातीय ऐक्य आणि दंगली रोखण्यासाठी संघटनेने तळागाळात केलेले कार्य व्यापकपणे चर्चिले गेले आहे. त्यामुळे अठरापगड जातीतील हजारो युवकांसह मुस्लिम समाजातील तरुणही या संघटनेच्या विचारांकडे आकर्षित झाले.
राज्यात विविध सामाजिक आणि जनहिताच्या आंदोलनांमध्ये संभाजी ब्रिगेडने नेहमीच आघाडीची भूमिका बजावली. मात्र, सुमारे दहा वर्षांपूर्वी २०१६ मध्ये संघटनेत फूट पडली होती. सामाजिक कार्यावर भर देणारा एक गट आणि राजकीय भूमिका स्वीकारून निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणारा दुसरा गट अशा दोन प्रवाहांत संघटना विभागली गेली होती. या विभाजनामुळे कार्यकर्त्यांचे संघटनात्मक बळ कमी झाले होते तसेच वैचारिक आणि राजकीय संभ्रमही निर्माण झाला होता.
मात्र, दहा वर्षांनंतर ही दरी मिटवत पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रमुख नेते प्रवीण गायकवाड, मनोज आखरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे संभाजी ब्रिगेडची ताकद पुन्हा एकवटली असून राज्यभरातून त्याचे स्वागत होत आहे.
सोलापुरातील कार्यकर्त्यांनीही या एकीकरणाचे स्वागत करत संघटनेच्या आगामी सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी चळवळींना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. संघटनेची एकजूट ही समाजपरिवर्तनाच्या लढ्याला अधिक बळ देणारी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, श्याम कदम, सचिन जगताप, गिरीश जगदाळे, किरण घाडगे,प्रदीप कणसे, संभाजी भोसले, बाळासाहेब बागल, प्रीती कदम अभिंजली जाधव, यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी जिजाऊ ब्रगडच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
दक्षिण सोलापुरातील गुणवंत विद्यार्थ्यांना एक दिवसाचा सरपंच होण्याची संधी
सोलापूर झेडपीने कोल्हापुरातून आणल्या 1000 श्वानदंश लसी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात 304 जणांचे रक्तदान