सोलापूर ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना एक दिवसाचा सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. नवोदय विदयालय प्रवेश परिक्षा व ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी झालेल्या विदयार्थ्यांचा एक दिवस प्रतिकात्मक सरपंच म्हणून सन्मान व शैक्षणिक प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
आजचा विदयार्थी उदयाचा लोकप्रतिनिधी, भविष्य तुमचे-आमचे, समृध्द लोकशाहीचे या अंतर्गत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, उपसभापती वर्षा पटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विदयार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन याविषयी आवड निर्माण व्हावी तसेच विदयार्थ्यांना गावाचा कारभार, राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाज याची प्रत्यक्ष माहिती व्हावी या उद्देशाने नवोदय विदयालय प्रवेश परिक्षा व ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी झालेल्या विदयार्थ्यांचा सन्मान म्हणून त्यांना १ दिवस प्रतिकात्मक सरपंच करणेचा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येणार आहे. त्याबाबत परिपत्रकाद्वारे सर्व ग्रामपंचायतींना कळविण्यात आले असून त्यादृष्टीने मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
एक दिवस प्रतिकात्मक सरपंच हा उपक्रम दरवर्षी ४ जून रोजी राबविण्याचा आहे. तालुक्यातील जे विदयार्थी नवोदय विदयालय प्रवेशासाठी आणि ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत ते विदयार्थी एक दिवस प्रतिकात्मक सरपंच होतील. जे विदयार्थी नवोदय विदयालय प्रवेशासाठी व ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत ते विदयार्थी ४ जुन या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६या वेळेत आपल्या गावचे प्रतिकात्मक सरपंच असतील.
संबंधित ग्रामपंचायतीने नवोदय विदयालय प्रवेशासाठी आणि ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विदयार्थ्यांची सकाळी १० वाजता गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढावी. सन्मानपुर्वक ग्रामपंचायतीमध्ये आणून सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवून प्रतिकात्मक सरपंच म्हणून सन्मान करण्यात यावा. प्रतिकात्मक सरपंच यांना दिवसभर ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये सहभागी करुन घ्यावे, त्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती दयावी व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करावे. प्रतिकात्मक सरपंच यांना त्यादिवशी गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैदयकीय दवाखाने, अंगणवाड्या व गावातील इतर सुधारणा सुचविण्याची मुभा असेल. प्रतिकात्मक सरपंच यांनी सुचवलेल्या बाबीची नोंद ग्रामविकास अधिकारी यांनी स्वतंत्रपणे घ्यावी व त्या बाबी अवलोकनासाठी तालुका गटविकास अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात याव्यात. यामध्ये विदयार्थ्यांच्या सहभागाला प्रत्यक्ष महत्व दिले जात असलेमुळे त्यांच्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल. संबंधित ग्रामपंचायतीने हा उपक्रम प्रभावीपणे राबवून त्याचा संक्षिप्त अहवाल व छायाचित्रे पंचायत समिती कार्यालयास सादर करावीत.प्रतिकात्मक सरपंच यांनी घेतलेला कोणताही निर्णय अंमलात आणण्याचे बंधन प्रशासनावर असणार नाही तसेच कोणतेही प्रशासकीय/ आर्थिक अधिकार प्रतिकात्मक सरपंच यांना असणार नाहीत. सदर उपक्रम हा पुर्णपणे शैक्षणिक प्रयोग आहे. दिनांक ४ जून रोजी नवोदय विदयालय प्रवेशासाठी आणि ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विदयार्थ्यांना शिकविणारे शिक्षक मुख्याध्यापक, पालक यांचाही सत्कार ग्रामपंचायतीने करावयाचा आहे.प्रतिकात्मक सरपंच पदावर विदयार्थ्यास बसविलेनंतर विदयार्थ्यांचा फोटो काढून त्या फोटोची प्रत त्याच दिवशी विदयार्थ्यांना भेट म्हणून दयावयाची आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता ८ वी: मुल्ला अलिया पैगंबर,महिमकर असावरी नरहरी, अंत्रोळी, भैरामडगी साक्षी मल्लिकार्जुन, वळसंग, हुक्केरी समृध्दी लक्ष्मण, येळेगांव,बौराजदार सर्वेश रविंद्र, खानापूर, पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता ५ वी: हुक्केरी ओजस रामचंद्र, येळेगांव, चव्हाण अमित सतीश, चापला वस्ती, बागवान सिमरन हिरो, आहेरवाडी,शेख अहद बंदेनवाझ, आहेरवाडी, मकानदार सुपिया शब्बीर, आहेरवाडी
जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परिक्षा: अमीत सतिश चव्हाण,चापला वस्ती, रोहिणी शिवानंद कुंभार, मंद्रुप, येळेगांव: ओजस रामचंद्र हुक्केरी.

More Stories
संभाजी ब्रिगेड पुन्हा एकसंघ: सोलापुरात संभाजी महाराज चौकात जल्लोष
सोलापूर झेडपीने कोल्हापुरातून आणल्या 1000 श्वानदंश लसी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात 304 जणांचे रक्तदान