June 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

समाजकल्याणचे उत्कृष्ट काम करणाऱ्या मनोज म्हेत्रे यांना झेडपी प्रशासनाचे मोठे गिफ्ट

सोलापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खास अधिपत्याखालील सोलापूर झेडपीतील अधिकाऱ्यांमधील राजकारण संपण्याचे नाव घेत नाही. यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बळी जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. समाजकल्याण विभागातील दलितवस्ती विकास योजनेच्या काम वाटपाचे काम बघणारे मनोज म्हेत्रे यांना करमाळ्याच्या बीडीओनी निलंबित केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून सुडाचे राजकारण रंगले आहे. यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचा फटका झेडपीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे तर दुसरीकडे भानगडी करणारे कर्मचारी मोकाट राहिले आहेत. जिल्हा परिषदेत गेली चार वर्ष प्रशासकराज होते. या काळात राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर विकास निधी वाटप समितीचे अध्यक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आले. त्यामुळे आमदाराकडून आलेल्या कामांची लिस्ट पालकमंत्री गोरे यांनी तपासल्यानंतरच पुढे जात आहे. यात जिल्हा परिषदेकडील समाजकल्याण विभागाच्या दलितवस्ती विकास निधीचा मोठा वाटा आहे. पालकमंत्र्यांकडून आलेल्या याद्या तपासून विकासकामांच्या नोंदी घेऊन वर्क ऑर्डर देण्याचे काम वरिष्ठांनी मनोज म्हेत्रे यांच्याकडे सोपविले होते. वास्तविक म्हेत्रे यांची नियुक्ती करमाळा पंचायत समितीकडे आहे. तेथून समाजकल्याण विभागाचे काम पार पाडताना त्यांना प्रतिनियुक्ती देणे अपेक्षित होते. पण त्यांचा प्रस्ताव प्रशासनात अडकला. असे असतानाही म्हेत्रे यांनी समाजकल्याणमध्येच राहून ही जबाबदारी पार पाडली. पण करमाळा येथे नियुक्ती असताना तेथे ते गैरहजर असल्याचे कारण दाखवून बीडीओने बुधवारी त्यांना निलंबित केले असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई करण्यामागे मोठे राजकारण शिजले असल्याचे बोलले जात आहे.

समाजकल्याणचे अतिरिक्त काम पाहणाऱ्या मेहेत्रे यांचा अधिकाऱ्यांमधील राजकारणाचा बळी गेला असल्याबाबत कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेत गेली अनेक महिने अधिकाऱ्यांमध्ये राजकारण रंगले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आता नव्याने पदभार घेतलेल्या कुशल जैन यांना या गोष्टीची माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच फायदा घेत सुडाचे राजकारण यशस्वी करीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बळी घेतला जात असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

चोर सोडून संन्याशाला…

गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अशाप्रकारे बळी घेतला जात आहे तर दुसरीकडे अनेक भानगडी करून कर्मचारी वरदहस्ताने उजळ माथ्याने झेडपीत कामकाज करताना दिसून येत आहेत. अधिकाऱ्यांमधील राजकारणातून चोर सोडून संन्यासालाच फाशी देण्याचा प्रकार घडत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हेच सोलापूरचे पालकमंत्री असल्यामुळे पदभार घेतल्याबरोबर सीईओ कुशल जैन यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यात नाव होईल असे काम करण्याबाबत सल्ला दिला आहे. सीईओच्या चांगल्या संकल्पनेला फाटा मारत काही अधिकाऱ्यांनी आपली मनमानी सुरूच ठेवल्याने सोलापूर झेडपीची राज्यात बदनामी होत आहे. आता पालकमंत्र्यांनीच या प्रश्न लक्ष घालून अशा अधिकाऱ्यांची फाईल ओपन करावी अशी कर्मचाऱ्यांमधून मागणी होत आहे.