सोलापूर : कृषी सभापती असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष टक्केवारी मागतात असा आरोप करून खळबळ उडवून देणारे सोलापूर झेडपीचे माजी कृषी सभापती अनिल मोटे यांनी घेरडी ग्रामपंचायतमधील कारभाराच्या चौकशीसाठी गुरुवारपासून ग्रामपंचायतसमोर उपोषण सुरू केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अनिल मोठे यांनी सात मार्च रोजी घेरडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कोळी यांच्याकडे गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामाची माहिती मागितली होती. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून माजी सरपंच आरती जगदने या कामकाज पाहत आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्याकडून माहिती मिळत नसल्याने मोटे यांनी महिन्यापूर्वी सीईओची भेट घेऊन ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतने मिळालेल्या निधीतून बोगस कामे केल्याची तक्रार आहे. तक्रारीनंतर ग्रामविकास अधिकारी कोळी यांनी माहिती देण्याचे मान्य केले पण माहिती दिलीच नाही. त्यामुळे बुधवारी मोटे यांनी जिल्हा परिषदेत येऊन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची भेट घेतली. कागदपत्रांचे पैसे भरा माहिती दिली जाईल असे सांगण्यात आल्यानंतर मोटे घेरडीला परतले. पण पुन्हा ग्रामविकास अधिकारी कोळी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे वैतागून मोठे यांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीसमोर चटई टाकून उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीला उपोषण करण्याची वेळ येते हा विषय चर्चेचा झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे याबाबतीत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

More Stories
समाजकल्याणचे उत्कृष्ट काम करणाऱ्या मनोज म्हेत्रे यांना झेडपी प्रशासनाचे मोठे गिफ्ट
रंगभवन चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन सर्वांना होणार
उच्च न्यायालयाचा निर्णय वेगळाच पण झेडपी प्रशासनाने वाढविला दबाव