सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीच्या प्रशासन विभागातच फक्त गुणवंत कर्मचारी आहेत का?

सोलापूर : राज्य शासनाच्या गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांची शिफारस करण्यात आल्यामुळे फक्त प्रशासन विभागातच गुणवंत कर्मचारी आहेत काय? असा सवाल संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत सलग दुसऱ्या वर्षी प्रशासन विभागातीलच कर्मचाऱ्यांची गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी ग्रामविकास विभागाने मोठी नियमवली केली आहे. या नियमावलीचे निकष न तपासताच कर्मचाऱ्यांची शिफारस केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे यांनी केला आहे. ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 2 सप्टेंबर 2005 नुसार ग्रामविकास विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांना गुणवंत कर्मचारी अधिकारी म्हणून गौरव करण्याची योजना कार्यान्वित झाली. सदर निवड करताना खालील निकष वापरावयाचे आहेत. १) अधिकारी / कर्मचाऱ्यांची किमान १० वर्षे सेवा झालेली असावी.२) अधिकारी / कर्मचाऱ्यांची मागील ५ वर्षांच्या गोपनीय अहवालांची प्रतवारी अतिउत्कृष्ट / उत्कृष्ट असावी. ३) अधिकारी / कर्मचाऱ्यांची सचोटी व चारित्र्य उत्तम असावे.४) विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण नसावे.५) अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कामात वक्तशीरपणा व कामाचा निपटारा उत्तम असावा.६) अधिकारी / कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय कौशल्य, कामात गतिमानता व नावीन्याची आवड असावी.७) संगणकीकरणातील योगदान. ८) शासकीय खर्चात काटकसर / बचत व शासकीय उत्पन्न / महसूल वाढीसाठीचे योगदान.९) शासनाची / जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न / योगदान. १०) मंत्रालय (खुद्द) व क्षेत्रीय स्तरावर प्राप्त झालेली न्यायालयीन प्रकरणे, त्यावर वेळोवेळी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे आणि प्रकरणाचा जिद्दीने आणि चिकाटीने पाठपुरावा करून निकाल शासनाच्या बाजूने लागण्याच्या दृष्टीने व शासकीय खर्चात त्या अनुषंगाने झालेली कायमस्वरूपी बचत. ११) सर्वसामान्य जनता / लोकप्रतिनिधी यांच्याकडून रेंगाळणाऱ्या मागण्या, विविध कामासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी याबाबत वेळेचे केलेली कार्यवाही, प्रशासन अधिक लोकाभिमुख, विकासात्मक व गतिमान होण्यासाठी आणि लोकांचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, त्यानुसार कामात दाखविलेली कार्यतत्परता, कार्यक्षमता इ. बाबींचा विचार व्हावा. १२) नस्ती व्यवस्थापन व निर्णय घेण्याच्या दृष्टीने मोलाची मदत व भर घालणे व प्रसंगानुरूप योग्य निर्णय होण्याच्या दृष्टीने निःपक्षपणे व तळमळीने आवश्यक तो तपशील प्रयत्नपूर्वक जमा करणे, तपशीलवार व सुयोग्यरीत्या प्रकरण सादर करण्याच्या प्रक्रियेमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग. १३) पारंपरिक पद्धतीने काम न करता नवनवीन कल्पनांचा अविष्कार किंवा प्रगटीकरण करून सामाजिक, आर्थिक व राज्याच्या दृष्टीने व्यापक विचार करून समाजाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यामध्ये दाखविलेली आवड आणि रुची. १४) सोपविलेले काम गुणवत्तापूर्वक, चिकित्सकपणे, परिपूर्ण आणि बारकाईने अभ्यास करून दर्जेदार पद्धतीने व निःपक्षपातीपणे प्रकरण सादर करण्याची कार्यशैली व हातोटी आणि त्यामुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केलेले खास प्रयत्न. १५) आपल्या अधिपत्याखालील कर्मचारी व सहकारी यांच्यामध्ये कार्यसंस्कृती (Work Culture) व कार्यनीती (Work Ethics) रुजविण्याचा व जोपासण्याचा केलेला प्रयत्न. म्हणजेच फक्त गोपनीय अहवाल एवढाच निकष मर्यादित नाही. तर वरील बाबींची पूर्तता करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवंत पुरस्कार दिला जातो. त्यामुळे सदरचा पुरस्कार हा विशेष पुरस्कार ठरतो. पण यातील तीन चार बाबींचा विचारच केला जात नसल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

झेडपीचा पुरस्कार द्या…

जिल्हा परिषदेतर्फे गुणवंत कर्मचारी पुरस्कार सुरू करण्यात यावा अशी मागणी कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी केली आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात यावा असे त्यांनी सुचवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button