July 8, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बापरे… मोहोळ झेडपी शाळांच्या तपासणीत काय आढळले?

सोलापूर : उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या जनहित याचिका क्र. १/२०१८ मधील आदेशानुसार गठीत जिल्हास्तरीय तपासणी समितीने मोहोळ तालुक्यातील 6 जिल्हा परिषद शाळांची सखोल पाहणी केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने करण्यात आलेल्या या तपासणीत अनेक शाळांमधील मूलभूत सुविधांच्या उणिवा समोर आल्या, काही शाळांनी उत्कृष्ट कामगिरी करून समितीची प्रशंसा मिळविली.

समितीची पहिली बैठक प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कार्यालयातील निधी कक्षात बैठक पार पडली. या बैठकीत चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील शैक्षणिक वर्षात समिती अध्यक्ष डॉ शब्बीर औटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे कामकाज राज्यात उत्तम झाल्याबाबत समिती सचिव शिक्षणाधिकारी कादर शेख यांचेहस्ते डॉ शब्बीर औटी यांचा सन्मान करण्यात आला.

तपासणीदरम्यान समितीने जिल्हा परिषद शाळा मोहोळ क्रमांक १ व २ येथे स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणले. तसेच शाळेच्या संरक्षण भिंतीलगत अतिक्रमण करून दरवाजे काढण्यात आल्याचे आढळले.या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत माननीय न्यायाधीशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून अतिक्रमण त्वरित हटविण्याचे आदेश दिले.

संबंधित नागरिकाला समज दिल्यानंतर त्यांनी स्वखुशीने अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शविली. जिल्हा परिषद शाळा मोहोळ क्रमांक ३ मध्ये स्वच्छतागृहासाठी अपुरा पाणीपुरवठा, शाळेच्या भिंतींवर वाढलेली झाडेझुडपे तसेच बंद अवस्थेतील संगणक आढळून आले. याबाबत तातडीने कार्यवाही करून सुविधा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबाबत अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे दिसून आल्याने समिती अध्यक्षांनी मुख्याध्यापकांना स्पष्ट शब्दांत खडसावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

मोहोळ येथील मुलींच्या जिल्हा परिषद शाळेत परिसरात अस्वच्छता, पटांगणात साचलेले पाणी, विद्युत कनेक्शनचा अभाव आणि अर्धवट अवस्थेतील स्वच्छतागृह अशी परिस्थिती आढळून आली. याशिवाय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना कडक ताकीद देण्यात आली. दर्जा सुधारण्याच्या सूचना देऊन खराब झालेले धान्य तातडीने नष्ट करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना समितीने दिल्या.

जिल्हा परिषद उर्दू शाळा, मोहोळ येथे मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांच्या सुविधा अपुऱ्या असल्याचे तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर खाजगी गाळा उभारून अतिक्रमण झाल्याचे आढळले. याप्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ पत्रव्यवहार करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. शाळेची पटसंख्या घटत असल्याबद्दलही चिंता व्यक्त करत विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक व प्रशासनाने समन्वयाने विशेष प्रयत्न करण्याची अपेक्षा समितीने व्यक्त केली.

याउलट चंद्रमौळी गणेश मंदिर शाळेने उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली. शाळेतील ई-लर्निंग सुविधा, संगणक शिक्षण, अध्यापनाचा दर्जा, विद्यार्थ्यांची शिस्त आणि प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेची सुरू असलेली तयारी याबाबत समितीने समाधान व्यक्त केले. शाळेची पटसंख्या १३५ असून त्यापैकी १२० विद्यार्थी उपस्थित असल्याचे पाहून समितीने मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.

या तपासणी मोहिमेत समिती अध्यक्ष डॉ. शब्बीर आवटी, उपजिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी तथा तहसीलदार जयश्री पंचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. एस. गोडबोले, प्रवीण सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस. व्ही. पवार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे, प्राथमिक विभागाचे प्रतिनिधी बापूराव जमादार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.