सोलापूर

सोलापूरची रब्बी ज्वारी संकटात

यंदा गहू, हरभऱ्याचेही क्षेत्र घटणार

सोलापूर : जिल्ह्यात यंदा हस्त, स्वाती नक्षत्र कोरडे गेल्याने रब्बी ज्वारीची पेरणी समाधानकारकपणे होऊ शकली नाही. पावसाअभावी गहू, हरभरा, करडईच्या क्षेत्रावरही परिणाम झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस समाधानकारक झाला नाही. त्यानंतर रब्बी हंगामाचीही आता तीच स्थिती राहिली आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला नसल्यामुळे शेतजमीन कोरडीठाक दिसत आहे. ज्या ठिकाणी पाऊस झाला अशा शेतकऱ्यांनी कमी ओलीवर ज्वारीची पेरणी केली आहे. उगवण झालेली ज्वारी आता उन्हाच्या कडाक्याने तग धरणार की नाही ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यात मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर,बार्शी, माळशिरस, माढा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी ज्वारीची पेरणी झाल्याचे दिसत आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात ज्वारीची उगवण चांगली दिसत असली तरी ऑक्टोबर हिटने अनेक ठिकाणी ज्वारी जळून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्रही घटले असून उत्पादन घटणार आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर अखेरीस गहू, हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पण यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने विहिरी, बोर आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गव्हाच्या पेरणीला म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही. चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी वाढ न झालेल्या उसाचा चाऱ्यासाठी वापर सुरू झाला आहे. उन्हाचा कडाका वाढतच असून ही स्थिती राहिल्यास दुभत्या जनावराचा प्रश्न गंभीर होणार आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर खरिपाचे उत्पादन हाती येते. पण यंदा शेतकऱ्यांच्या हातीच काहीच नसल्याने दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप पिक विम्याचाही अद्याप निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button