June 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हासाठी कशाला हट्ट करेन…

सोलापूर : मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हा कारसाठी कशाला हट्ट करेन, अशा शब्दात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी गाडीच्या वादावर पडदा टाकला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार घेऊन दीपक वैद्य यांना दोन महिने उलटले आहेत. यापूर्वींच्या अध्यक्षांची सफारी जीर्ण झाल्यामुळे नूतन अध्यक्ष वैद्य यांना गाडी नाही. त्यामुळे भाड्याची इनोव्हा कार सध्या ते वापरत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सर्वच पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्या खरेदीची प्रक्रिया राबवली आहे. गाड्या कोणत्या घ्यायच्या हेही ठरलेले आहे आणि तशी गाड्या खरेदीची ऑर्डरही दिली आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिले आहे.

असे असतानाही इनोवा कारसाठी झेडपी अध्यक्षांचा हट्ट अशा काहीशा बातम्या माध्यमावर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या खुर्चीत बसविले आहे. अध्यक्ष झाल्यावर मला गाडी मिळत आहे. यापूर्वी कोणत्याही गाडीत बसण्याचा मला योग आला नव्हता. अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी असलेल्या बजेटनुसार महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही 700 ही गाडी घेण्याचे तेव्हाच ठरले आहे. एक्सयुव्ही 700 मध्ये बसण्याचे मला भाग्य मिळणार आहे हेच खूप मोठे आहे. मी कोणत्याही गाडीसाठी हट्ट धरलेला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.