सोलापूर : जिल्हा परिषदेच्या 102 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सवरील कंत्राटी चालकांची दिवाळीतही उपासमार झाली आहे.
आरोग्य विभागाच्या कुटुंब कल्याणअंतर्गत कार्यक्रमासाठी गरोदर मातांना सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 77 आरोग्य केंद्रामध्ये ॲम्बुलन्स आहे. 102 क्रमांकावर कॉल केल्यानंतर या ॲम्बुलन्सची सुविधा गरोदर मातांसाठी दिली जाते. बाळंतपणांसाठी गरोदर मातांना आरोग्य केंद्रापर्यंत नेणे व तिथून डिलिव्हरीनंतर परत घरी सोडणे तसेच कुटुंब कल्याणअंतर्गत शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना याॲम्बुलन्सद्वारे सेवा दिली जाते. या ॲम्बुलन्सवर कंत्राटी चालक आहेत. यापूर्वी एका संस्थेला चालक पुरविण्याचा ठेका होता. त्या संस्थेचा करार संपल्यानंतर गेल्या 14 महिन्यापासून या चालकांचे मानधन रखडले आहे. दिवाळीत किमान उचल तरी द्यावी, अशी कंत्राटी चालकांनी मागणी केली होती. परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य विभागाची अशी अवस्था झाली आहे.