सोलापूर : पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कलम न वाढवणे, अटक करून टेबल जामीन देणे व न्यायालयात पीसी न मागण्यासाठी 30 हजार रूपये लाचेची मागणी करून मध्यस्थामार्फत दहा हजाराची मुलांच्या खेळण्यातील नोटांसह लाच स्वीकारताना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली.
हवालदार प्रमोद कांबळे व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदार यांच्यासह कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. होण्याचा तपास आरोपी हवालदार कांबळे यांच्याकडे होता. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रमोद कांबळे यांनी 3० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यामध्ये तक्रारदार यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांना कलम 326 न वाढवता व या गुन्ह्यात अटक केल्यानंतर टेबल जामीन देणे व पोलीस कोठडी न मागण्याच्या अटीवर हि लाच मागितली. तडजोडीअंती वीस हजार देण्याचे ठरले व पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे याच्याकडे देण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे अलकुंटे यांनी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले. लाचलुचपत पोलिसांनी हा ट्रॅप लावताना पाच हजाराच्या खऱ्या नोटा व पाच हजार मुलांच्या खेळण्यातील नोटा तक्रारदारांकडे दिल्या होत्या. त्या नोटा झिरो पोलीस अलकुंटेमार्फत स्वीकारताना पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी या दोन्ही आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याने आरोपींना बेड्या घालायला हव्या होत्या पण त्याच तपास अधिकाऱ्यालाच बेड्या पडल्याने सोलापुरात चर्चेचा विषय झाला आहे.

More Stories
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी
मोहोळमधील त्या Evm चे पुढे काय झाले…