सोलापूर: नवभारत साक्षरता अभियानात केंद्र शासनाने दखल घेतलेल्या ७६ वर्षीय सुशीला आजींनी शनिवारी बार्शी तालुक्यातील बोरगाव येथे  ऊसतोड कामगारांना साद घातली. असाक्षर आणि स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी ठरत असलेल्या सुशीला क्षीरसागर व त्यांची नऊवर्षीय नात रुचिता यांचेहस्ते ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

बार्शी तालुक्यातील टोणेवाडी येथील असाक्षर सुशीला क्षीरसागर या सध्या बारामती येथे तात्पुरत्या स्थलांतरित झाल्या आहेत. त्या मणक्याच्या आजाराने त्रस्त असल्याने नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवक म्हणून त्यांची नात रुचिता हिने त्यांचे शिक्षण घरीच सुरू केले आहे. या दोघींच्या छायाचित्राची दखल केंद्र शासनाने घेऊन त्यांचे प्रेरणादायी छायाचित्र साक्षरता अभियानाच्या उल्लास फेसबुक पेजवर पोस्ट केले. शिवाय रुचिता क्षीरसागर ही आपल्या गायनातून साक्षरतेचा जागर करत आहे. त्याचीही दखल केंद्र व राज्य शासनाने घेऊन कौतुक केले.

दिवाळी निमित्त क्षीरसागर कुटुंबीय बार्शी तालुक्यात आले आहे. सुशीला आजी यांनी आपले माहेर बोरगाव (खुर्द) येथे शनिवारी भेट दिली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी व पारखेड येथील वीस ऊसतोड मजूर बोरगाव (खुर्द) येथे पंधरा दिवसापासून ऊसतोड कामास असल्याचे समजले. त्यांची दिवाळी उसाच्या फडातच झाली. क्षीरसागर कुटुंबीयांनी या मजुरांशी संवाद साधत त्यांचे शिक्षण व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. नव भारत साक्षरता अभियानात प्रौढांसाठी सुरू असलेल्या ‘सर्वांसाठी शिक्षणा’ची त्यांना माहिती दिली.

बोरगाव येथील जालिंदर अंबुरे यांच्या उसाच्या फडात क्षीरसागर कुटुंबीयांनी या ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप केले आणि त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी राजेश क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर, श्रीरंग ननवरे, जयराम ननवरे, ऋतिक ननवरे, अनिकेत ननवरे, लेखिका मानसी चिटणीस यांच्यासह बोरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *