सोलापूर : दसरा – दिवाळीच्या मुहूर्तावर गळीत हंगामाला सुरुवात केलेल्या साखर कारखानदारांना उसाची चणचण भासत असल्यामुळे आता चीट बॉय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शोधत असल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापुरात कर्नाटकातील  साखर कारखान्यांनी धडक मारली असून जागेवरच भाव ठरवून उसाची पळवा पळवी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामात पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सीना- भीमा खोऱ्यात असलेली ऊसशेतीही यंदा संकटात आहे. पाऊस कमी पडल्याने उसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. अशात बऱ्याच जणांनी चाऱ्यासाठी उसाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वाढलेल्या साखर कारखान्यांना यंदा मुबलक ऊस मिळणे अवघड झाले आहे. अशात दक्षिण सोलापुरात कर्नाटकातील साखर कारखान्यांनी प्रवेश केला आहे. हार्वेस्ट मशीनद्वारे या कारखान्याच्या टोळ्या उसाच्या शेता शेतात फिरताना दिसत आहेत. साखर कारखान्याच्या चिटबाॅयला खूप महत्त्व असते. ऊस भरपूर असताना आपला ऊस लवकर जावा म्हणून शेतकरी चीटबॉयच्या मागे लागताना दिसून येत होते. पण आता परिस्थिती उलट दिसत आहे. चिटबॉय नोंदी असलेले शेतकरी ऊस देतात का? हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत.

एफआरपीवरून दरवर्षी गोंधळ होतो. त्यामुळे यंदा बऱ्याच साखर कारखान्यांनी आधीच भाव जाहीर करून हंगामाला सुरुवात केली आहे. अशात कर्नाटकातील शेतकऱ्यांनी घुसखोरी करून जागेवरच तीन ते साडेतीन हजार भाव देण्याचे ठरवून उसाची पळवा पळवी सुरू केली आहे.  त्यामुळे यापेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांची अडचण होणार आहे. पावसाअभावी ऊस वाळत चालल्याने ऊस लवकर जावा ही शेतकऱ्यांची भूमिका असल्याने जो जादा दर देईल व पैसे न मागता ऊस तोडून नेईल त्याला ऊस दिला जात आहे. यंदा ऊस तोडीसाठी पैसे मोजण्याची शेतकऱ्यांवर वेळ येणार नाही, असे चित्र दिसत आहे. महिनाभरात ऊस शेती संपुष्टात येईल व कारखान्यांची मोठीच अडचण होईल,  अशी यंदाची परिस्थिती दिसत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील विहिरी, बोअर आटण्याच्या मार्गावर असल्याने उसाची शेती काढून टाकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदापेक्षा पुढील वर्षीचा गळीत हंगाम साखर कारखान्यांना खूपच अडचणीचा ठरणार असे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *