-
सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे मोठे जिद्दी निघाले आहेत .त्यांनी आपल्या मालकीचा लिलाव झालेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथील ‘लोकशक्ती” साखर कारखाना पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे . लिलावात बोली बोललेल्या मंद्रूपचे युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांच्या कंपनीने मुदतीत रक्कम न भरल्याने बयानापोटी भरलेले दीड कोटी जप्त झाले आहेत .
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व मोहोळचे उद्योजक विजयराज डोंगरे यांना आपल्या स्वतःचा एक साखर कारखाना असावा, असे स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नाला त्यांचे वडील व जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन मनोहरभाऊ डोंगरे यांनी पाठबळ दिले. अतिशय जिद्दीने त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे कारखान्यासाठी जमीन घेऊन उभारणी सुरू केली. कारखान्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यासमोर संकट उभा राहिले. या अडचणीतून कारखान्याचा गाळप शुभारंभ घेण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक उद्योजकांकडे हेलपाटे मारले पण मदत झाली नाही. त्यामुळे कारखान्याला आर्थिक मदत केलेल्या बँका कर्ज थकल्यामुळे कोर्टात गेल्या. कोर्टाने बँकाची देणी वसूल करण्यासाठी कारखान्याचा लिलाव जाहीर केला. मार्चमध्ये जाहीर झालेल्या लिलावामध्ये राज्यातील मान्यवर बारा कंपन्यांनी सहभाग नोंदवला. त्यात चार कंपन्या रिजेक्ट झाल्या. आठमधून प्रत्यक्ष लिलावच्या वेळी तीन कंपन्या हजर झाल्या. यामध्ये कोल्हापूरची गीतांजली, लातूरची देशमुख यांची शुगर कंपनी आणि मंद्रूपचे युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांची एप्राॅनडिस्टरलरी या तीन कंपन्यांचा समावेश होता. कोर्टाने कारखान्यासाठी 131 कोटीची बोली लावली. शेवटी मुगळे यांच्या कंपनीला लिलाव मंजूर झाला आहे. मुगळे यांनी लोकशक्ती कारखाना घेतल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या नावाची राज्यभरात चर्चा सुरू झाली होती पण लिलावात मंजूर केलेली बोलीप्रमाणे उर्वरित रक्कम मुदतीत मुगळे भरू न शकल्याने त्यांनी लिलावापोटी जमा केलेली दीड कोटी बयाना रक्कम जप्त झाली आहे. त्यानंतर पुन्हा डोंगरे यांनी लिलावातील रक्कम क्लेमद्वारे जमा करून कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यात यश मिळवल्याचे सूत्रांनी सांगितले.