
सोलापूर: माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील बऱ्याच काळानंतर मंगळवारी सोलापुरात आले होते खरे, मात्र त्यांनी राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी घेणे टाळले. विजयदादांच्या या अनपेक्षित दौऱ्याची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू आहे.
विजयसिंह मोहिते- पाटील बांधकाम मंत्री असताना सोलापुरात त्यांचा मोठा दरारा होता. ते दौऱ्यावर आले की विश्रामगृह ते कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी असायची. जिल्हा परिषदेत तर मोहिते- पाटील यांचीच बरीच काळ सत्ता होती. त्यामुळे ते दौऱ्यावर आल्यावर माळशिरसमधून मोठ्या वाहनांचा ताफा सोलापुरात यायचा. पक्ष व राजकारण विहिरीत त्यांचे कामकाज असायचे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते त्यांचे जवळचे मित्र आहेत. प्रश्न कोणताही असो तो सोडवण्याची तळमळ असल्याने अनेक जण त्यांच्या भेटीला येत. जिल्ह्याचा दांडगा अभ्यास, विकासाची तळमळ असल्याने प्रशासनावर त्यांची मोठी पकड होती. त्यामुळे जिल्ह्यात दादांचा बोलबाला असायचा ‘दादा है तो कुछ भी नामुमकिन नही” असे कार्यकर्ते हक्काने म्हणायचे.
बदलत्या राजकीय घडामोडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोहिते- पाटील गटाची पकड कमी होत गेली. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून मोहिते- पाटील गटाचे भाजपशी सख्ख्य जमल्यानंतर विजयदादांचा सोलापूर शहर दौरा कमी झाला. आजारपण व थायरॉईडच्या त्रासामुळे बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांचे दौरे कमी झाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात ते सोलापुरात येणार अशी चर्चा होती, पण मंगळवारी एका लग्नाच्या निमित्ताने त्यांनी सोलापूर शहराचा दौरा केला. ते सोलापूरला येत आहेत म्हटल्यावर राजकारणातील एका बड्या नेत्याने त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. पण उगीच राजकीय चर्चा नको म्हणून जुन्या मित्राचे त्यांनी जेवण टाळल्याची चर्चा आहे. शासकीय विश्रामधाममध्ये त्यांनी जेवण घेणे पसंत केले व त्यानंतर ते पुन्हा अकलूजकडे रवाना झाले. पण त्यांच्या या दौऱ्याची सोलापुरात चर्चा सुरू आहे.