सोलापूर : सोलापूर शहरातील काजळी व उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर व तेलगाव येथील वाळू उपसा थांबेना झाला आहे. या दोन्ही गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर शहरात ‘काजळी” वाढत चालल्याचे यापूर्वीच ‘सोलापूर समाचार”ने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनाला आणले आहे. शहरातील अनेक घरांवर, मोकळ्या मैदानात, वृक्ष, वाहने व मोठ्या इमारतीवर काजळीचा थर साचत चालला आहे. उन्हात वाळत घातलेल्या कपड्यांवर काजळीचा परिणाम दिसून येत आहे. या काजळीचा आरोग्यावर थेट परिणाम दिसून येत आहे. श्वासाधरे काजळी फुफ्फुसात गेल्याने दमा, एलर्जीचे प्रकार वाढले आहेत. तसेच रस्त्यावरून वाहनावरून जाताना काजळी डोळ्यात गेल्यास डोळ्यांना इजा होण्याचे प्रकार घडत चालले आहेत. तरीही या गंभीर प्रदूषणाकडे प्रदूषण मंडळांने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. ही काजळी कुठून येते याचाच प्रदूषण मंडळ अजून शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही या प्रश्नाचे गांभीर्य दिसून येत नाही.
दुसरीकडे सीना नदीतून वाळू उपसा सुरूच आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर व तेलगाव येथून रात्री वाळू उपसा करून शहराकडे आणला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एसपी स्क्वाड येत आहे, अशी भीती दाखवून बरेच जण आपला डाव साधून घेत असल्याचेही सांगण्यात आले. वास्तविक पोलीस अधीक्षकानी असा कोणताही स्क्वाड अद्याप नेमलेला नाही. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी मंद्रूप हद्दीतील जुगारावर कारवाई केली पण सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत रात्री खुलेआम सुरू असलेल्या वाळू उपसाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. या बेकायदेशीर वाळू उपशाला आशीर्वाद कोणाचा? अशी चर्चा आता रंगली आहे.