
सोलापूर : माकपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसया आडम यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
रे नगरमधील 15 हजार घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. सोलापुरातील कामगारांचे स्वप्न साकार झाल्याने अडमास्तर ही भावुक झाले. 9 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रे नगर घरकुलाचा पायाभरणी समारंभ केला होता. त्यावेळेस त्यांनी या घरकुलाची चावी देण्यासाठी मी पुन्हा येणार असे वचन दिले होते. हे वचन पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे दिल्लीवरून पुन्हा सोलापुरात आले आहेत. त्यांनी वचन पूर्ण केल्याबद्दल सोलापूर वाशिम तर्फे मी त्यांचे आभार मानतो. अरे नगरला पाणी नव्हते त्यामुळे मी पीएम कार्यालयाकडे गेलो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला पाणी देण्याचे वचन दिले. अन लागलीच ntpcतून रे नगरला पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आत्ता रे नगर मधील रहिवाशांना 24 तास फुकट पाणी मिळणार आहे. मोदी यांनी रे नगरच्या अंगणात पाणी नव्हे गंगाच आणली आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी यांची स्तुती केली. भारत देशात सोलापुरात कामगारांचे एक नवीन शहर निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील लाभार्थी दिवाळी व रमजान एकाच दिवशी साजरी करीत आहेत, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. उर्वरित पंधरा हजार घरकुल डिसेंबरअखेर पूर्ण होतील. येथील रहिवाशांना मोफत वीज मिळण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाने 200 कोटीचे बिनव्याजी कर्ज दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे त्यांनी आभार मानले. रे नगर या वसाहतीत केंद्र व राज्य शासनाने इतक्या सुविधा दिल्या. बाजूलाच यापूर्वी बांधलेल्या गोदुताई विडी घरकुल मधील 50 हजार रहिवासी आता आम्हालाही ड्रेनेज व रस्त्यांची सोय करा, अशी मागणी करीत असल्याचे आडम मास्तर यांनी निदर्शनाला आणले. नंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी दिलेल्या आश्वासनाचे पूर्तता केली हे माझी गॅरंटी आहे असे सांगितले.