March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी सोलापुरात मॉल उभारणार

सोलापूर : उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी जिल्हास्तरावर माॕल उभा करण्यासाठी सहकार्य करणार आहे.बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या साठवणूकीसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी १ कोटी ६ लाख इतका निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर केला असल्याचे असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंर्तगत वोरोनाका प्रशालेमध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर या दोन विभागाचा दि.१९ ते २१ जानेवारी या कालावधीत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री पाटील हे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, आजच्या महिलांमध्ये पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. पण त्यांनी स्वतःची ओळख फक्त हाऊस वाईफ न ठेवता घरातील जबाबदारी पार पाडून घर व संसाराला हातभार लावण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन बाजारात कोणत्या उद्योग व सेवांची गरज आहे, हे लक्षात घेऊन विविध उद्योग सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्यात बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी मेळघाट मार्केटप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या वस्तू विकत घेऊन त्यांना पुरेसे पैसे देण्याची व्यवस्था निर्माण करा आणि त्यासाठी मी कधीही सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रास्तविकामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून कठोर परिश्रम घेऊन विविध वस्तूंची निर्मिती करत आहेत.त्यांच्या वस्तूंचे ब्रँडिंग करण्यासाठी अॕप निर्मिती, आॕनलाईन करणे यासाठी लवकरच प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी केले.  मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे,सहाय्यक लेखाधिकारी सुर्यकांत तोडकरी, शितल म्हांता, अमोल गलांडे, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.

आव्हाळे यांचे कौतुक!

सोलापूर जिल्ह्यात बचत गटाची चळवळ जोमाने वाढण्यासाठी पर्यायाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला मनिषा आव्हाळे या कर्तव्यदक्ष महिला मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याबद्दल पालकमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांचे कौतुक केले.

आव्हाळे यांनी घेतला पाणीपुरीचा आस्वाद

आजच्या रुक्मिणी महोत्सवामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी उदघाटन कार्यक्रमानंतर स्वतः बचत गटाच्या सर्व स्टाॕल भेट देऊन भेळ व पाणी पुरीचा मनमुरादपणे आस्वाद घेतला तसेच त्यांनी हँडबॅग, घाण्यावर तयार केलेले सूर्यफूलांचे तेल खरेदी केले.त्यामुळे बचत गटाच्या स्टाॕलधारक महिलांमध्ये उत्साह आल्याचे दिसून आले.