सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांना सिव्हिल हॉस्पिटल व जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्यामधील रियालिटी माहित नाही केवळ शिवसेनेला प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असावा अशी शंका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी सोलापूर येथे बोलताना व्यक्त केली.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गुरुनानक चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयास भेट दिली. या रुग्णालयाचे उद्घाटन कधी होणार? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी आरोग्य मंत्री सावंत यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की अद्याप बांधकामातील काही त्रुटी आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच आरोग्य विभाग ही इमारत ताब्यात घेईल. बांधकाम विभागामार्फत या इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर आरोग्य विभागाकडे इमारतीचे हस्तांतर होईल. त्रुटी असताना आम्ही इमारत ताब्यात घेणार नाही. महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल त्यानंतर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल. असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा व महिला बाल रुग्णालयाचे उद्घाटन कधी होणार व कामाच्या त्रुटीबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलता याकडे लक्ष वेधले असता आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी सिविल हॉस्पिटल बाबत प्रश्न उपस्थित केला होता. सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय कॉलेजचे आहे तर आता नव्याने होणारे जिल्हा व महिला बाल रुग्णालय हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहे. त्यांना या दोन्हीमधील रियालिटी माहित नसल्यामुळे केवळ शिवसेनेच्या मंत्राला प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली.