- सोलापूर : राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्यात सादर केलेल्या प्रसंगांनी सोलापूरकरांच्या अंगावर रोमांच उभे केले. कलामंचावर अवतरलेल्या हत्ती,घोडे, उंट यामुळे शिवकालीन थरारांचा अनुभव रसिकांना घेता आला. रविवार व सोमवार असे आणखी दोन दिवस जिल्ह्यातील रसिकांना हे महान शिवनाट्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
शिवगर्जना महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शीतल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, महानाट्य दिग्दर्शक स्वप्निल यादव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थितांनी या महानाट्यातून छत्रपती शिवरायांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.शिवगर्जना या महानाट्यात जवळपास अडीचशे कलाकार सहभागी झाले आहेत. घोडे, उंट व हत्ती हे प्राणी यात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास महानाट्याच्या माध्यमातून सादर केला आहे शिवरायाचे बालपण यापासून त्यांच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग यात सादर केले आहेत. शिवरायांची प्रतिज्ञा, शाहिस्तेखान भेट, अफजलखान वध, बाजीप्रभूंनी लढवलेली खिंड, शिवराज्याभिषेक, तानाजी मालुसरे यांचा पराक्रम पाहताना शिवप्रेमींच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरील एन्ट्री, युद्ध प्रसंगावेळी कला मंचावर अवतरलेले हत्ती, घोडे, उंट यांच्यामुळे हे नाट्य आणखीन भव्यदिव्य ठरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा आणखीन दोन दिवस लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात हे महानाट्य सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण केले आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे.