सोलापूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शनिवारी मध्यरात्री रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळ्याला प्रचंड गर्दी झालेली असतानाच एक रुग्णवाहिका सायरन वाजवत गर्दीच्या दिशेने वेगाने आली आणि क्षणात आपला उत्साह बाजूला ठेवून शिवप्रेमींनी गर्दी पांगवत या रुग्णवाहिकेला रस्ता उपलब्ध करून दिला. हे दृश्य पाहत असताना अनेकांचा श्वास क्षणभर रोखला गेला. एका रुग्णाला जीवदान देण्यासाठी शिवप्रेमीनी इतक्या गर्दीतही आपले
कर्तव्य पार पाडल्याने पोलिसांनी आभार मानले आहेत.
या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ मा साहेबांच्या सिंदखेड राजा येथील वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे ,रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, महापालिका आयुक्त शितल उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे ,धर्मदाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, यांच्यासह वीर पत्नी वर्षा श्रीहरी लटके, देवकी रत्नाकर हडपद ,रेखा शावरेआपा नावी, सुरेखा जयहिंद पन्हाळकर, कांताबाई भोसले, रत्नाबाई बाबुराव चांदोडे, सुषमा दत्तात्रेय माने यांच्याहस्ते पाळणा उत्सव संपन्न झाला.या भव्य पाळणा सोहळ्यासाठी महिलावर्ग नऊवारी साडी आणि पारंपारिक वेशभूषा करून शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. रात्री दहा वाजल्यापासून चौकात गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली होती. हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचे राजमाता जिजाऊ मासाहेब, वीरांगणा व लोकशाही मधील रणरागिनी,न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावरती रात्री दहा ते अकरा या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
हा पाळणा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, सचिव प्रीतम परदेशी, खजिनदार अंबादास शेळके, ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बरडे ,राजन जाधव, शिवाजीराव घाडगे, दिलीप कोल्हे, विक्रांत वानकर, अनिकेत पिसे, प्रभाकर रोडगे, विनोद भोसले यांच्यासह उत्सव अध्यक्ष सुभाष पवार , खजिनदार सुशील बंदपट्टे , कार्याध्यक्ष रवी मोहिते, उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले, अंबादास सपकाळे यांनी परिश्रम घेतले.
पोलिसांनी घेतली दक्षता
शिवाजी चौकामध्ये पाळणा कार्यक्रमासाठी शिवप्रेमीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सगळीकडे जय शिवाजी जय भवानी च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. पुणे, बार्शी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी शिवाजी चौक हा एकमेव रस्ता आहे पाळणा सुरू होण्याच्या काही क्षण अगोदर रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाकडे जाण्यासाठी वेगाने चौकात आली त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली पण शिवप्रेमीच्या शिस्तीमुळे पोलिसांना काही करावेच लागले नाही.