सोलापूर : जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये आत्ता चांगलाच  रंग भरला आहे.  महिला कर्मचाऱ्यांनी खो-खो व कबड्डीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून रविवारी सकाळी या दोन्ही सामन्यांची रंगत वाढली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याहस्ते शनिवारी दुपारी विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. त्यानंतर नेहरूनगर येथील मैदानावर महिलांच्या खो-खो व कबड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. शनिवारी दारातील पौर्णिमा होती. शेतकऱ्यांच्या जीवनात या पौर्णिमेला महत्त्व आहे. शेतातील विविध धान्यांची ताटे दारासमोर मांडून पुरणपोळीच्या नैवेद्यासह पूजा केली जाते. हा सण साजरा करून सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट तालुक्यातील पंचायत समितीच्या महिला कर्मचारी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आल्या. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर खऱ्या अर्थाने महिलांच्या खो-खो व कबड्डी स्पर्धेला रंग भरला आहे. क्रिकेट स्पर्धेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी बाजी मारली. दोन सामने त्यांनी खेळले. त्यानंतर पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला. या वयातही त्यांची खिलाडीवृत्ती पाहून अनेक कर्मचाऱ्यांना नवल वाटले.

रविवारी सकाळी खो खो महिला सेमी फायनल सामना मोहोळविरुद्ध दक्षिण सोलापूर पंचायत समिती महिला कर्मचारी संघात झाला. दक्षिण सोलापूर पंचायत समितीने यात मोठे यश मिळवले. कबड्डी महिला सेमी फायनल सांगोला विरुद्ध करमाळा पंचायत समिती संघामध्ये झाला. यात सांगोला टीम फायनलमध्ये पोहोचली. आता खो-खो व कबड्डी फायनल मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मैदानावर मोठी गर्दी केली आहे. महिलांच्या खो-खो व कबड्डी स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. महिला क्रीडा मध्ये पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षिका अंगणवाडी कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या टीमने स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *