सोलापूर : सोलापुरात शनिवारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकांसमोर भिडले. निमित्त होते जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे. उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला. अधिकारी संघाने पत्रकार संघावर मात केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी 11 तालुक्याच्या पंचायत समिती व मुख्यालयाचा एक अशा 12 संघांनी मैदानावर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे यांच्याहस्ते क्रीडाज्योत आणण्यात आली. सीईओ आव्हाळे यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली. त्यानंतर मार्गदर्शन करताना सीईओ आव्हाळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांची व सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले. खिलाडू वृत्तीमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते तर सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन संजय सावंत व पवार सर यांनी केले.
मनीषा आव्हाळे यांची बॅटिंग
त्यानंतर नेहरूनगर शासकीय मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला. सामन्याच्या उद्घाटनावेळी प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंगवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जोरदार बॅटिंग केली. टॉस पत्रकार संघाने जिंकल्यावर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघातर्फे कॅप्टन कटारे, अकबर बागवान, शेखर गोतसुर्वे, विनोद कामतकर, संदीप येरवडे, आप्पा पाटील, अमोल साळुंखे, मनोज भालेराव, इमरान सगरी, अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड, राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केले. पत्रकार संघाने सात ओव्हरमध्ये 68 रन काढले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन कटारे यांनी धुवाधार बॅटिंग केली.
जिल्हा परिषद पत्रकार संघाचे आव्हान अधिकारी संघाने एक ओव्हर व आठ गडी राखून संपुष्टात आणले. जिल्हा परिषद अधिकारी संघातर्फे ओपनर कॅप्टन तथा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर व पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक अमोल जाधव यांनी जोरदार खेळी केली. भालेराव यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे यांनी आव्हानात्मक कॅच घेत जाधव यांना बाद केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मैदान मारले. शेवटी फोर मारून त्यांनी अधिकारी संघाला मॅच जिंकून दिली. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सुनील कटकधोंड, अविनाश गोडसे यांनी क्षेत्ररक्षण जोरदार केले. सामनावीर म्हणून अमोल जाधव यांना घोषित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यात शर्थीची झुंज झाली. एरव्ही बातमीचे मैदान मारणारे पत्रकार मात्र क्रिकेटच्या मैदानात अधिकाऱ्यांकडून एक पाऊल मागे राहिले. जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यामधील हा फ्रेंडली सामना अतिशय चर्चेचा ठरला. सीईओ आव्हाळे यांनी शेवटपर्यंत सामना पहात सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या खिलाडूवृत्तीचे कर्मचाऱ्यांमधून कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेत पत्रकार आणि अधिकारी यांच्या बऱ्याच काळानंतर असा सामना झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.