सोलापूर: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सोलापूर शहर काँग्रेस भवनने आपला नाम फलक कापडाने झाकून घेतला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसऱ्या टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी 13 मे ला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होईल. सहावा टप्प्यासाठी 25 मे आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होईल.मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. सतराव्या लोकसभेचा कालावधी 16 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. देशातील 96 कोटी मतदार यंदा मतदान करतील.त्यात शंभर वर्षांवरील मतदारांची संख्या 2 लाख आहे. सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा मतदार संघाच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेचे आचारसंहिता लागू होणार म्हणून जिल्हा परिषद महसूल व महापालिका मधील काही कार्यालय शनिवारी सुरू होती. मार्चअखेर व नवीन कामांचा मुहूर्त या ज्यादा कामात साधण्यात आला. आचारसंहिता लागू झाली की महापालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सरकारी गाड्या काढण्यात येतात.  पण सध्या या ठिकाणी प्रशासकराज सुरू असल्याने ही धावपळ दिसून आली नाही.  काँग्रेसने मात्र तातडीने आपल्या कार्यालयाचा फलक कापडाने झाकला.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?👇

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

सोलापूर लोकसभा निवडणूक वेळापत्रक

आचारसंहिता लागू :- 16 मार्च

नामनिर्देशन अर्ज :-12 एप्रिल

उमेदवारी अर्ज छाननी :-20 एप्रिल

उमेदवारी अर्ज माघारी घेणे :- 22 एप्रिल

मतदान :-7 मे

मतमोजणी :-4 जून

निवडणूक प्रक्रिया समाप्ती :- 6 जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *