सोलापूर : बारावी भूगोल विषयाच्या उत्तर पत्रिकेत जगाचा नकाशा प्रिंट करून उत्तरपत्रिकेची पाने कमी करा, अशी मागणी पुणे विभागीय मंडळातील शिक्षकांनी बोर्डाच्या सहाय्यक संचालक मीनाक्षी राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारावी बोर्डाच्या पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी शनिवारी पुणे बोर्डाच्या सहाय्यक संचालक मीनाक्षी राऊत यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये युवराज खुळे, लक्ष्मण राख, सुधाकर कांबळे, पद्मिनी सारोळे, तानाजी घाडगे कासाप्पा चिल्लाळ, संतोष अजनाळकर, शैलेंद्र मंगळवेढेकर यांचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना खुळे म्हणाले की बारावीच्या भूगोल विषयाच्या उत्तरपत्रिकेसाठी सुमारे 28 पाने आहेत. बरेच विद्यार्थी दहा ते पंधरा पाने रिकामी सोडतात. याशिवाय नकाशा पुरवणी म्हणून जोडला जातो. नकाशा जोडताना दोऱ्याने बांधला जातो. बऱ्याच वेळा पेपर तपासणीच्या वेळेस ही पुरवणी गहाळ होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच उत्तरपत्रिकेची बरीच पाने रिकामी सोडल्याने मंडळाचे आर्थिक नुकसान तर होतेच याशिवाय पेपर तपासणाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे भूगोल विषयाच्या उत्तरपत्रिकेची आठ पाने कमी केल्यास आर्थिक बचत होईल व शिवाय पर्यावरणाला मदत होईल. कागद बनविण्यासाठी खूप मोठा खर्च येत असतो. त्यामुळे गरज नसताना कागद रद्दी होण्याऐवजी उत्तर पत्रिकेची पाने कमी केल्यास बऱ्याच समस्या दूर होतील. ज्या विद्यार्थ्यांना भरपूर लिहायचे आहे त्यांना पुरवणीद्वारे ही सोय करता येईल. शिक्षकांचे म्हणणे समजावून घेऊन सहसंचालक राऊत यांनी याबाबत बोर्डाकडे शिफारस केली जाईल असे आश्वासन दिले.