सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वागदरी झेडपी शाळेच्या केंद्रप्रमुख बदलण्यात आलेला नाही तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाच्या औषधालयाची वाताहात झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा मोठा प्रश्न सोडवला. केंद्रप्रमुखांची अनेक दिवसांपासून रखडलेली पदोन्नती त्यांनी ऑक्टोबरमध्ये केली. नव्याने नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुखांना पदभार घेताना ज्या मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता त्यांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले होते. तरीही अनेक मुख्याध्यापक या पदाला चिकटून बसले होते. शेवटी प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी याबाबत आदेश जारी केला. त्यानंतर तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख यांच्या नावासह पदभार सोडण्याचा आदेश जारी केला. परंतु अक्कलकोट तालुक्यातील वागदरी केंद्रप्रमुख यांनी अद्याप पदभार सोडला नसल्याची तक्रार आहे. या भागातील नव्याने पदभार घेतलेल्या केंद्रप्रमुखांनी वागदरी केंद्रप्रमुखाचा पदभार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी तक्रारी होत असल्याने आहे त्याच मुख्याध्यापकाने प्रभारी पदभार सांभाळला आहे. गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्याशी ‘त्या” मुख्याध्यापकाचे साटेलोटे असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.
इकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषधालयाची अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करणारे जिल्ह्याचे प्रमुख औषधालय सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात आहे. चार वर्षापूर्वीच्या कथित प्रकरणावरून येथील फार्मसिस्ट प्रवीण सोळंकी यांची चौकशी झाली होती. या चौकशीत काहीच तथ्य आढळले नव्हते. पुन्हा नव्याने हे प्रकरण उकरून काढण्यात आले. यावरून आरोग्य उपसंचालक पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पत्र दिल्याचे सांगण्यात आले. या पत्रावरून आव्हाळे यांनी सोळंकी यांचा पदभार काढला आहे. वास्तविक ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकक्षात येते. पण चौकशीविनाच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता वैद्यकीय कारणास्तव प्रतिनियुक्तीवर आलेल्या एक महिला कर्मचारी येथे आहेत. त्यामुळे येथील यंत्रणा सांभाळण्यास कोणीच नसल्याने जिल्हा औषधालयाचा कारभार रामभरोसे झाल्याचे दिसून येत आहे.