सोलापूर : नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ‘नाणे” गुरुजीचा शोध लागला आहे. मंद्रूप झेडपी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
मंद्रूप जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव यांच्याविषयी आपल्याकडे तक्रार आली आहे. मुख्याध्यापक जाधव यांनी फायनान्सच्या माध्यमातून काही लोकांकडून पैसे घेतले व नंतर व्याजासह पैशाची मागणी झाल्यावर गेल्या काही दिवसापासून ते गायब आहेत. यातून मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांच्याकडे असलेल्या लोकांच्या पैशाची आर्थिक वसुली होण्यासाठी मुख्याध्यापक जाधव यांची भविष्य निर्वाह निधी व पेन्शनची रक्कम देण्यात येऊ नये, अशी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी शेख यांनी सांगितले. या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांना आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक जाधव गेल्या दोन महिन्यापासून मंद्रूपच्या जिल्हा परिषद मराठी शाळेवर येत नसल्याची तक्रार आहे. ते सध्या वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सर्व ती खातरजमा करण्यात येत आहे.
मुख्याध्यापक जाधव यांच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे एक तक्रार आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी सांगितले. गणेश व अन्य एका फायनान्सच्या माध्यमातून जाधव यांनी लोकांकडून ठेवी घेतल्या व नंतर ते पैसे व्याजासह परत करण्यास असमर्थता दर्शवली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ते संपर्कात नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पण या तक्रारदाराची गुंतवणूक नसल्याने अर्जाची चौकशी करण्यात येत आहे. ज्या लोकांची अशी फसवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेची संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून मंद्रूप परिसरात या आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. परंतु फसवणूक झालेले ठेवीदार अद्यापपर्यंत पुढे न आल्यामुळे हे प्रकरण गुलदस्त्यात राहिले आहे. याबाबत पोलीस, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु तक्रारदारांमध्ये गुंतवणूकदारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.