सोलापूर : व्यसनमुक्ती, विधायक कृतीशिलता, एकात्मकता वाढवण्याच्या उद्देशाने मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथील युवकांनी अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायणसह, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. मंगळवार (दि. ९) गुढीपाडव्यापासून हरिनाम सप्ताह होणार असून सप्ताहाचे यंदाचे तिसरे वर्षे आहे.
मंद्रूप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वांत मोठ्या लोकवस्तीचे गाव. २१ वर्षांपूर्वी गावामध्ये दोनदा श्री रामायण ग्रंथाचे पारायण झाले होते. तेव्हापासून मधला मारुती मंदिरात दररोज हरिपाठ, भजन होते. गावातील काही युवकांनी आठ वर्षांपासून मंद्रूप-पंढरपूर पायी-वारी सुरु केली. मंदिरात भजनाच्या निमित्ताने जमणाऱ्या ज्येष्ठ मंडळीच्या समवेत काही मोजके तरुण भजनामध्ये सक्रीय सहभागी होऊ लागले. विविध व्यसनांमध्ये गावातील काही तरुणाई गुरफटत होती. त्या मित्रमंडळींना व्यसनांमधून बाहेर काढण्यासाठी गावामध्ये संत विचार, सत्संग कार्यक्रम निमित्ताने विधायक उपक्रमांची चळवळ सुरु करण्याचा निर्धार जय हनुमान भजनी मंडळाने केला. सकारात्मक विचार, एकसंघता वाढेल या उद्देशाने अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनाची इच्छा जय हनुमान भजनी मंडळातील युवकांनी गावातील ज्येष्ठ मंडळी समोर व्यक्त केली. त्यास सर्वांनी उस्फुर्त प्रतिसादासह, सर्वतोपरी सहकार्याचे पाठबळ दिले. मागील काही महिन्यांपासून गावातील युवक तयारीसाठी धडपडत आहेत. विविध क्षेत्रातील लोकांनी अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायणास सहकार्य केले आहे. मंडळाचे सुनील लाड, विनायक कोरे, बबन देशमाने, ओंकार झेडेकर, मुकेश देवीदास यांच्या जय हनुमान भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
या महाराज मंडळींची किर्तन सेवा
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने २२ ते २६ मार्च दरम्यान मंद्रूपच्या हनुमान मंदिरात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने मंद्रूप गावामध्ये वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मांदियाळी असेल. अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, दत्तात्रय क्षीरसागर महाराज, प्रकाश महाराज साठे, दिपाली खिळे, बाल-प्रवचनकार जय भगरे (अकोले), कबीर अत्तार महाराज यांचे किर्तन, प्रवचन होणार आहेत.